Raigad Ganpati Visarjan Pudhari
रायगड

Raigad Ganpati Visarjan: रायगडमध्ये आज ५६ हजार गणेशमूर्तींचे होणार विसर्जन; गौरी-गणपती विसर्जनासाठी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

समुद्र, नदीसह तलावांवर पोलिसांची नजर

पुढारी वृत्तसेवा

अलिबाग: रायगड जिल्ह्यात गौरी-गणपती विसर्जनाची तयारी पूर्ण झाली असून, विसर्जन मिरवणुका शांततेत आणि सुरळीत पार पडाव्यात यासाठी प्रशासनाने विशेष खबरदारी घेतली आहे.

जिल्ह्यात ८५ सार्वजनिक, ५६ हजार ३८३ घरगुती गणपती आणि १७ हजार गौरींचे विसर्जन करण्यात येणार आहे. शनीवार १९ साप्टेंबर रोजी गौरी-गणपतींच्या विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात सर्वत्र कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

अलिबाग, उरण, मांडवा, आक्षी, मुरूड, श्रीवर्धन आणि रेवदंडा येथील समुद्रकिनाऱ्यांवर गणेशमूर्तींचे विसर्जन होणार आहे. तसेच जिल्ह्यातील विविध ठिकाणी नदी, खाडी आणि तलावांमध्ये विसर्जन केले जाणार आहे. संध्याकाळी चार वाजल्यापासून विसर्जनाला सुरुवात होणार असल्याने गर्दीच्या ठिकाणी पोलिसांचा विशेष बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

यंदाच्या विसर्जन मिरवणुकांमध्ये लेझर लाईटच्या वापरावर आणि डीेज वर बंदी घालण्यात आली आहे. विसर्जन स्थळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी समुद्र, खाडी, नदी आणि तलाव परिसरात पोलिसांची विशेष नजर राहणार आहे. जिल्ह्यात समुद्रकिनाऱ्यावरील ५६ ठिकाणी, खाडी परिसरातील १०९, नदी परिसरातील २६१, १०४ तलाव आणि अन्य ९४ ठिकाणी गणेशमूर्तींचे विसर्जन होणार आहे.

गौरी-गणपती उत्सवामुळे कोकणात सध्या उत्साहाचे वातावरण आहे. मुंबईसह विविध भागांतून चाकरमानी मोठ्या संख्येने रायगडमध्ये दाखल झाले आहेत. गणपतीपाठोपाठ गौरींचेही आगमन झाल्याने महिलावर्गात विशेष उत्साह दिसून आला. कोकणातील परंपरेनुसार तेरड्याच्या वनस्पतीची गौर आणण्याची प्रथा आहे.

गुरुवारी सायंकाळी महिलांनी वाजतगाजत रानमाळावरून तेरड्याच्या गौरी आणल्या. त्यानंतर गौरींची आकर्षक सजावट करून दागदागिन्यांनी त्यांना मढविण्यात आले. पूजा-अर्चा आणि आरतीनंतर भाजी-भाकरी व दह्याचा नैवेद्य दाखविण्यात आला. रात्री महिलांनी गौरींसमोर नाचगाणी करीत उत्सवाचा आनंद घेतला.

दरम्यान, जिल्हयात दीड दिवसाचे सार्वजनिक १३ तर खाजगी २६ हजार १६९ गणेशमूर्तींची प्राणप्रतिष्ठापना झाली होती. तीन दिवसांचे सार्वजनिक २, खाजगी ३०, चार दिवसाचा सार्वजनिक एक, पाच दिवसाचे सार्वजनिक ८, खाजगी १ हजार ३२९, सहा दिवसांचे (गौरी-गणपती) सार्वजनिक ८४, खाजगी ५८ हजार ८७ गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना झाली आहे. सात दिवसांचे सार्वजनिक ८, खाजगी ४७, आठ दिवसांचे सार्वजनिक ५, खाजगी ४७, नऊ दिवसांचे सार्वजनिक १, खाजगी २०, दहा दिवसांचे सार्वजनिक १, खाजगी २२०, अकरा दिवसांचे सार्वजनिक ७, खाजगी ४ हजार ९७८, अनंत चतुर्दशीचे सार्वजनिक १५९ तर खाजगी १३ हजार ४३९ गणेशमूर्ती आहेत.

तर २६ सप्टेंबर ते ४ ऑक्टोबरपर्यंत सार्वजनिक २ व खाजगी ६८८ असे एकूण सार्वजनिक २९१ तर खाजगी १ लाख ५ हजार ५४ गणेशमूर्तींची प्राणप्रतिष्ठापना झालेली होती.

विसर्जन घाटांवर सुविधा

विसर्जन घाटांवर आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना ग्रामपंचायतींना देण्यात आल्या आहेत. दामिनी पथक आणि बिट मार्शल यांच्याकडून विसर्जन घाट परिसरात नियमित गस्त घातली जाणार आहे.

तसेच पोलिसांकडून पायी पेट्रोलिंग करून गर्दीच्या ठिकाणी बारीक नजर ठेवली जाणार आहे. बाजारपेठांमधील मोठ्या गणेश मंडळांच्या परिसरातही पोलिसांची विशेष नजर राहणार असून, नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT