Raigad Fort Pudhari
रायगड

Raigad Fort: रायगड किल्ल्याला वणव्याचा विळखा; पाणीपुरवठा व विद्युत वाहिन्यांचे मोठे नुकसान

पंधरा दिवसांत दुसरी घटना, शिवभक्त व ग्रामस्थांमध्ये संताप

पुढारी वृत्तसेवा

महाड: ऐन उन्हाळ्यात उष्णतेची तीव्रता वाढत असताना रायगड जिल्ह्यात वणव्यांच्या घटनांमध्ये मोठी वाढ होत आहे. राखीव वनक्षेत्रांसह खाजगी जमिनींवरही वारंवार लागणाऱ्या आगीमुळे वनसंपत्तीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. अशातच आज छत्रपती शिवाजी महाराजांची ऐतिहासिक राजधानी असलेल्या किल्ले रायगडालाही वणव्याचा विळखा बसला.

या आगीत किल्ल्यावर पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिन्या तसेच विद्युत केबल्स अनेक ठिकाणी जळून नष्ट झाल्या आहेत. घटनेचे गांभीर्य ओळखून वन विभागाचे अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले असून आग विझवण्याचे प्रयत्न करण्यात आले. दरम्यान, सुमारे पंधरा दिवसांपूर्वीही रायगड परिसरात अशाच प्रकारचा वणवा लागल्याची घटना घडली होती. वारंवार घडणाऱ्या या घटनांमुळे स्थानिक ग्रामस्थ व शिवभक्तांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.

जानेवारी महिन्यापासून रायगड जिल्ह्यातील डोंगरमाथ्यांवर वणव्यांचे प्रमाण वाढले असून अनेक ठिकाणी वनसंपदा जळून खाक झाली आहे. आज दुपारच्या सुमारास रायगड किल्ल्यावर लागलेल्या आगीमुळे हिरकणी वाडीपासून महादरवाजापर्यंतचा परिसर आगीच्या भक्षस्थानी पडला. प्राथमिक माहितीनुसार, अज्ञात व्यक्तीकडून लावलेल्या आगीमुळे नुकसान झाले आहे. किल्ल्यावर पाणीपुरवठ्यासाठी टाकलेल्या प्लॅस्टिक जलवाहिन्या नियमानुसार जमिनीत पुरणे आवश्यक असतानाही त्या उघड्यावर ठेवण्यात आल्याने त्या पूर्णतः जळून गेल्या. त्याचप्रमाणे विद्युत केबल्सही उघड्यावर असल्याने त्या देखील आगीत नष्ट झाल्या.

याबाबत पर्यटक व शिवभक्तांनी संताप व्यक्त करताना म्हटले की, ऐतिहासिक वारसा असलेल्या किल्ल्यावर काम करताना संबंधित अधिकाऱ्यांनी योग्य नियोजन केले असते, तर जलवाहिन्या व विद्युत केबल्स जमिनीत टाकून असे नुकसान टाळता आले असते.

हिरकणी वाडी ते महादरवाजा परिसर आगीत सापडला

हिरकणी वाडीपासून लागलेली आग वाऱ्याच्या वेगाने पसरत थेट महादरवाजापर्यंत पोहोचली. त्यामुळे पायरी मार्गावरील पाणीपुरवठा व विद्युत वाहिन्यांचे मोठे नुकसान झाले.

टकमक टोक सुरक्षित

या वणव्याचा फैलाव टकमक टोकापर्यंत झाला नसल्याने तो भाग सुरक्षित राहिला. मात्र हिरकणी वाडीच्या बाजूचा मोठा परिसर पूर्णतः जळून खाक झाला आहे. घटनेदरम्यान वन विभागाचे अधिकारी रोपवेने किल्ल्यावर पोहोचल्याचे काही पर्यटकांनी सांगितले. पायरी मार्गाने गेले असते, तर प्रत्यक्ष नुकसानाचे स्वरूप अधिक स्पष्टपणे लक्षात आले असते, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. या पार्श्वभूमीवर वन विभागाने अधिक जबाबदारीने व गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी शिवभक्तांकडून करण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT