नाते ः इलियास ढोकले
हिंदवी स्वराज्याची राजधानी असणार्या किल्ले रायगडावर मागील आठ ते दहा दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने गडावरील सर्व तलाव व जलाशयाच्या 70 पेक्षा जास्त टाक्या भरून वाहू लागल्याची माहिती प्राप्त झाली आहे. यामुळे शिवभक्तांच्या वर्षभरातील सोयीसाठी हा पिण्याचा पाण्याचा साठा मुबलक होईल असा विश्वास प्रशासनाकडून व्यक्त होत आहे.
किल्ले रायगडावर गंगासागर तलाव, हत्ती तलाव, हनुमान टाके कुशावर्त तलाव, काळा हौद या प्रमुख तलावांसह सुमारे 70 पेक्षा जास्त छोटे हौद व टाक्या उपलब्ध आहेत. मागील आठ ते दहा दिवसांपासून रायगड किल्ले परिसरात होणार्या मुसळधार पावसाने या सर्व टाक्या व तलाव भरून वाहू लागल्याची माहिती गडावरील शिवभक्त तसेच ग्रामस्थांकडून प्राप्त झाली आहे.
मागील काही वर्षात किल्ले रायगडावर येणार्या शिवभक्त पर्यटकांची संख्या लाखोमध्ये गेली आहे. या गोष्टी लक्षात घेता गडावर येणार्या शिवभक्तांना मुबलक पाणीसाठा त्यांच्या दैनंदिन वापरासाठी मिळावा याकरता स्थानिक प्रशासनामार्फत विशेष प्रयत्न केले जात होते.
किल्ले रायगडाच्या पायथ्याशी असणार्या पाचाड रायगड वाडी परिसरामध्ये पाण्याची भीषण टंचाई मार्च एप्रिल नंतर जाणवत असतानाच किल्ले रायगडावर मात्र या काळामध्ये मुबलक पाणीसाठा उपलब्ध होत असल्याने रायगडावर येणार्या शिवभक्तांना आता या ठिकाणी अधिक संख्येने येणे शक्य होणार आहे.
रायगड प्राधिकरणामार्फत गंगासागर तलाव व हत्ती तलावांच्या दुरुस्तीची कामे प्राधान्याने हाती घेण्यात आली होती त्यामध्ये भरीव यश प्राप्त झाल्याने या तलावातून गळती होणारे पाणी रोखण्यात आता प्राधिकरणाच्या प्रशासनाला यश प्राप्त झाल्याचे स्पष्टपणे दिसून येते. किल्ले रायगडावरील असलेल्या अनेक जलाशयांना अधिक संरक्षित करण्याचे मी रायगड प्राधिकरण विशेष योजनेद्वारे काम करणार असल्याचे यापूर्वीच प्राधिकरणाचे अध्यक्ष संभाजी राजे छत्रपती यांनी स्पष्ट केले होते.
या ठिकाणी उपलब्ध होणारे पाणी भविष्यात अधिक संख्येने झाल्यास त्याचा व्हिडिओ रायगडच्या पायथ्याशी असलेल्या गावांना करता येऊ शकेल का याबाबत शास्त्रीय दृष्टिकोनातून तपासणी होणे आवश्यक असल्याच्या प्रतिक्रिया स्थानिक शिवभक्त ग्रामस्थांमधून व्यक्त होत आहेत.
एकूणच किल्ले रायगडावरील जलाशयाच्या सर्व समस्यांना पूर्तता झाल्याने शिवभक्त तसेच स्थानिक प्रशासनामध्ये समाधान व्यक्त होत आहे. मागील काही वर्षात रायगड प्राधिकरणामार्फत झालेल्या जलाशयांच्या दुरुस्तीचा हा परिणाम असल्याची प्रतिक्रिया येथील शिवभक्त आणिकडून व्यक्त होत आहे.
दरम्यान महाडमध्ये मागील काही वर्षांच्या तुलनेत 2500 मिलिमीटर एवढाच पाऊस झाला असताना किल्ले रायगडावर मात्र मुबलक पाणीसाठा झाल्याने शिवभक्त पर्यटकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
70 छोटे हौद
किल्ले रायगडावर गंगासागर तलाव, हत्ती तलाव, हनुमान टाके कुशावर्त तलाव, काळा हौद या प्रमुख तलावांसह सुमारे 70 पेक्षा जास्त छोटे हौद व टाक्या उपलब्ध आहेत.