श्रीकृष्ण द बाळ
महाड: हिंदवी स्वराज्याची राजधानी असणाऱ्या किल्ले रायगडावर पावसाळ्यामध्ये प्रतिवर्षी गणेशोत्सवा पश्चात फुलणाऱ्या वैविध्यपूर्ण फुलांनी शिवभक्त पर्यटकांना भुरळ घातल्याचे दृश्य सध्या पहावयास मिळत आहे. किल्ले रायगडाच्या सर्व दूर रंगीबेरंगी रान फुलांनी निर्माण केलेल्या रंगबिरंगी शाल पर्यटकांना आकर्षित करीत आहे. डोंगर माथ्यावर, पठारावर तसेच किल्ल्याच्या तटबंदीच्या ठिकाणी या वैविध्यपूर्ण पद्धतीच्या रानफुलांनी मनाला मोहन टाकणारी ठरली आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात किल्ले रायगडावर झालेल्या वैविध्यपूर्ण घटनांचा हा किल्ला साक्षीदार आहे. मागील काही वर्षापासून पावसाळ्यादरम्यान या ठिकाणी निसर्गाने केलेली मुक्त हस्तांची या रानफुलांची उधळण या किल्ल्याच्या इतिहासाला नवीन ओळख करून देणारी ठरली आहे. किल्ले रायगड हा केवळ आता इतिहास म्हणून पाहिला जात नसून या ठिकाणी पावसाळ्यामध्ये होणाऱ्या या रंगीबेरंगी रानफुलांच्या करीता देखील शिवभक्त पर्यटक मोठ्या संख्येने भेट देत असल्याचे पहावयास मिळाले.
सोनकीच्या पिवळ्या गालीच्यावर लालसर जांभळा रंगाचा तिरडा आणि पांढऱ्या निळ्या रंगाची लाल रानफुले उठून दिसत आहेत. हिरव्यागार गवतामध्ये डोकवणारी या रंगाची उधळण पाहताना निसर्गाचा नवीन कॅनव्हास निर्माण झाल्याचे दिसून येते. गडाच्या सर्व भागांमध्ये या रानफुलांनी केलेली उधळण दोन ते चार आठवड्यापुरतीच राहत असल्याने शिवभक्त पर्यटकांना या ठिकाणी येण्यासाठी ती आकर्षित करीत आहे. गेल्या काही दिवसात किल्ले रायगड व महाड परिसरामध्ये होणाऱ्या मुसळधार पावसामध्ये देखील शिवभक्त पर्यटक मोठ्या संख्येने किल्ले रायगडावरील हा ऐतिहासिक ठेवा पाहण्यासाठी येत असल्याची माहिती स्थानिक ग्रामस्थांकडून देण्यात आली.
किल्ले रायगडावर सध्या कोणतीही नवीन काम सुरू नसले तरीही किल्ले रायगडावरील पावसाचा आनंद गेल्या काही वर्षात निर्माण झालेल्या या रानफुलांच्या ताटव्यांनी परिसर फुलून गेल्याचे दिसून येते. ऐतिहासिक स्थळ म्हणून परिचित असलेला किल्ले रायगड सध्या निसर्गाच्या रंगोत्सवामध्ये अनोख्या पद्धतीने शिवभक्तांना आकर्षित करील असल्याचेच दिसून आले आहे.