इलियास ढोकले
नाते: रायगड किल्ल्यावर जाणाऱ्या शिवभक्त आणि पर्यटकांसाठी दिलासादायक बातमी समोर आली असून, देखभाल व दुरुस्तीच्या कामासाठी बंद ठेवण्यात आलेली रायगड रोपवे सेवा आता नियोजित वेळेच्या आधीच सुरू होणार आहे.
रोपवे प्रशासनाने तत्परतेने कामे पूर्ण केल्याने मंगळवार ३ नोव्हेंबर २०२६ पासून रोपवे सेवा पुन्हा पर्यटकांच्या सेवेत पूर्ववत दाखल होणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
रायगड रोपवेची हंगामपूर्व देखभाल, दुरुस्ती आणि तांत्रिक तपासणी करण्यासाठी २१ सप्टेंबर ते १५ नोव्हेंबर या कालावधीत सेवा तात्पुरती बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला होता. या कालावधीत रोपवे यंत्रणेची आवश्यक देखभाल, तांत्रिक दुरुस्ती आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्त्वाच्या तपासण्या हाती घेण्यात आल्या होत्या.
मात्र, रोपवे प्रशासनाने कामांना गती देत नियोजित वेळेपूर्वीच ही कामे पूर्ण करण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले. त्यामुळे १६ नोव्हेंबरपासून सुरू होणारी सेवा आजपासूनच पूर्ववत करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
दिवाळीच्या सुट्ट्यांचा कालावधी आणि रायगड भेटीसाठी येणाऱ्या पर्यटकांची संभाव्य गर्दी लक्षात घेता रोपवे सेवा लवकर सुरू होणे पर्यटकांसाठी मोठा दिलासा ठरणार आहे.
विशेषतः ज्येष्ठ नागरिक, महिला आणि लहान मुलांसह रायगड भेटीचे नियोजन करणाऱ्या शिवप्रेमींना याचा फायदा होणार आहे. रोपवे सेवा पूर्ववत सुरू झाल्याने रायगड पर्यटनालाही चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.