नाते ः चालू पावसाळी मोसमामध्ये किल्ले रायगड परिसरात पडणार्या मुसळधार पावसाने गडावर जाणार्या पायरी मार्गावरील दगड कोसळण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत आहेत. या ठिकाणी झालेल्या अशाच घटनेमुळे वीज मंडळाच्या डीपीचे मोठे नुकसान झाल्याचे वृत्त स्थानिक ग्रामस्थांकडून प्राप्त झाले आहे.
किल्ले रायगडकडे जाणार्या पायरी मार्गावरील महादरवाजा नजीक काही अंतरावर उतारावर ही दगड कोसळल्याने डीपी पूर्णपणे क्षतीग्रस्त झाली आहे. त्यामुळे तेथील विद्युत पुरवठा बंद करण्यात आल्याची माहिती विद्युत मंडळाकडून देण्यात आली आहे.सध्या सुरू असलेला पाऊस लक्षात घेता काही दिवसांमध्येच या डीपीची पुन:उभारणी करण्यात येईल व त्याकरता अत्यावश्यक असलेली कार्यवाही पूर्ण झाल्याची माहिती विद्युत वितरण विभागाकडून देण्यात आली.
गेल्या दोन वर्षात पावसाळ्यामध्ये झालेल्या दुर्घटनांचा संदर्भ घेत जिल्हा प्रशासनाने ऑगस्ट अखेर पर्यंत किल्ल्यावर पायरी मार्गाने जाण्यास बंदी केली होती. तसेच शासनाच्या रेड अलर्ट असेल अशावेळी त्या पश्चात गडावरील पायरी मार्गावरील वाहतूक बंद ठेवावी असे निर्देश दिले होते.
प्रशासनाने नोंद घेणे गरजेचे
काही दिवसापूर्वी झालेल्या या डीपी वरील दगड कोसळण्याच्या घटनेनंतर या मार्गावरील गडावर जाणार्या शिवभक्त पर्यटकांच्या जीवाला धोका निर्माण होणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग व केंद्रीय पुरातत्व विभागाने अशा अपघातांची गंभीर नोंद घेऊन संबंधित ठिकाणी सावधानतेचे फलक लावावेत अशी मागणी शिवभक्त पर्यटकांकडून शासनाला करण्यात येत आहे.