रायगड किल्ल्याची युनेस्को पथकाकडून पाहणी Pudhari Photo
रायगड

Raigad Fort | रायगड किल्ल्याची युनेस्को पथकाकडून पाहणी

पुढारी वृत्तसेवा

किल्ले रायगड ः प्रतिष्ठित जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेशासाठी नामांकनाच्या मुल्यांकन प्रक्रियेचा एक भाग म्हणून युनेस्कोच्या शिष्टमंडळाने गुरुवारी (3 ऑक्टोबर) रायगड जिल्ह्यातील रायगड किल्ल्याला भेट दिली आणि पाहणी केली. भेटीदरम्यान युनेस्कोच्या शिष्टमंडळाने स्थानिक प्रतिनिधी आणि गावकर्‍यांशी देखील संवाद साधला.

भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (एएसआय), महाराष्ट्र राज्य पुरातत्व विभाग, वन विभाग आणि स्थानिक प्रशासन यांच्या अधिकार्‍यांसह युनेस्कोच्या पथकाने किल्ल्याची सखोल पाहणी केली. या पथकाने कुशावर्त तलाव, होळीचा माळ, जगदीश्वर मंदिर, बाजारपेठ, छत्रपती शिवाजी महाराज समाधी, हत्तीखाना, भवानी मंदिर आणि टोक, टकमक टोक, या महत्त्वपूर्ण ठिकाणांसह विविध ऐतिहासिक खुणांना भेट दिली. या पथकाने किल्ल्याचा इतिहास आणि सद्यस्थितीबद्दल उपस्थित अधिकार्‍यांकडून तपशीलवार माहिती घेतली. या पथकामध्ये आंतरराष्ट्रीय तज्ञ हेवान्ग ली, सहसंचालक जागतिक वारसा (एएसआय) मदन सिंग चौहान, महाराष्ट्र शासन पुरातत्व विभाग संचालक सुजित उगले, उपसंचालक हेमंत दळवी, डॉ. शुभा मजुमदार यांचा समावेश होता.

जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्यासोबत झालेल्या चर्चेदरम्यान त्यांनी किल्ल्यातील हवामान, वनस्पती आणि इतर संबंधित पर्यावरणीय घटकांवर चर्चा केली. तसेच या किल्ल्याच्या संवर्धनासाठी रायगड जिल्हा प्रशासनाने घेतलेले निर्णय, सुरु असलेली कार्यवाही तसेच पर्यटन विकासासाठी केलेल्या उपाययोजना याबाबत माहिती घेतली.

युनेस्कोने नामांकनाच्या संदर्भात हाती घेतलेल्या उपक्रमांबद्दल जावळे यांनी समाधान व्यक्त केले. तसेच गडाच्या जतनामध्ये एकूणच प्रशासन, स्थानिक नागरिकांचा असलेला सहभाग याविषयी माहिती दिली.

युनेस्को टीमने देखील देखभाल आणि संवर्धनासाठी संभाव्य सुधारणांबद्दल त्यांची मते मांडली. भेटीदरम्यान, शिष्टमंडळाने स्थानिक प्रतिनिधी आणि गावकर्‍यांशी देखील संवाद साधला.

यावेळी प्रांत डॉ. ज्ञानोबा बाणापुरे, प्राधिकरणच्या सलोनी साळुंखे, युनेस्को सदस्य, प्राधिकरणाच्या सदस्या सलोनी साळुंखे, शिखा जैन, पुरातत्व विभाग शेख, रायगड पुरातत्व विभाग दिवेकर, वरूण भामरे, तहसीलदार महेश शितोळे, रोप वे प्रतिनिधी राजेंद्र जोग, पाचाड माजी सरपंच राजेंद्र खातू, उपसरपंच संदीप ढवळे, गाव कमिटी सदस्य हिरकणीवाडी मनोहर अवकीवकर आदीनी चर्चेत सहभाग घेतला. यावेळी रायगड किल्ला पाहण्यासाठी आलेल्या नवोदय विद्यालय निजामपूरच्या विद्यार्थ्यांशी देखील या पथकाने संवाद साधला.

किल्ल्याची जागतिक स्तरावर ओळख निर्माण होणार

छत्रपती शिवाजी महाराजांच्या वारसाशी जोडलेल्या 12 निवडक किल्ल्यांपैकी स्वराज्याची राजधानी असलेला हा रायगड किल्ला जागतिक स्तरावर ओळखण्यासाठी विचाराधीन आहे. या समावेशामुळे रायगड किल्ल्याला आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठा मिळेल आणि जागतिक पर्यटक आकर्षित होतील. स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळेल तसेच पर्यटनाला चालना मिळेल असा विश्वास जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी यावेळी व्यक्त केला.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT