Ragad Fire | किल्ले रायगडाच्या दक्षिण भागाला लागला वणवा; धनगर बांधवांच्या प्रयत्नांनी आला आटोक्यात! 
रायगड

Raigad Fort Fire | किल्ले रायगडाच्या दक्षिण भागाला लागला वणवा; धनगर बांधवांच्या प्रयत्नांनी आग आटोक्यात!

सुदैवाने या आगीत किल्ल्यावर असलेल्या कोणत्याही ऐतिहासिक वास्तूचे नुकसान नाही, सोशल मिडीयावर व्हिडीओ व्हायरल

पुढारी वृत्तसेवा

इलियास ढोकले

नाते : स्वराज्याची राजधानी असलेल्या किल्ले रायगडाच्या दक्षिण भागाला चार दिवसांपूर्वी भीषण वणवा लागल्याची घटना समोर आली आहे. या वणव्याचे काही व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यामुळे शिवप्रेमींमध्ये तीव्र भावना व्यक्त केल्या जात आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, वाघोली हद्दीतील दरीत लागलेला हा वणवा पुढे रायगडाच्या दक्षिणेकडील डोंगर उतारावर पोहोचला. पुढे तो भवानी टोक, काळा हौद परिसरापर्यंत पसरल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. रात्रीच्या अंधारात डोंगर उतारावर धगधगणाऱ्या आगीचे दृश्य अत्यंत भयानक दिसत होते.

इतिहासातील “पोटल्याच्या डोंगरावरून रायगडावर तोफांचा मारा झाला आणि किल्ला पडला” या घटनेची आठवण करून देणारे हे दृश्य असल्याची प्रतिक्रिया अनेक शिवप्रेमींनी व्यक्त केली आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमुळे या घटनेची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू झाली आहे.

दरम्यान, रायगड किल्ल्यावर राहणारे धनगर बांधव आणि पुरातत्व विभागाचे कर्मचारी यांनी प्रसंगावधान राखत तातडीने वणवा विझवण्यासाठी प्रयत्न केले. त्यांच्या शर्थीच्या प्रयत्नांमुळे अखेर हा वणवा आटोक्यात आणण्यात यश आले.

सुदैवाने या आगीत किल्ल्यावर असलेल्या कोणत्याही ऐतिहासिक वास्तूचे नुकसान झाले नसल्याची माहिती मिळाली असून मोठा अनर्थ टळला आहे. मात्र या घटनेमुळे रायगड परिसरातील वनसंवर्धन आणि सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT