Raigad News
नाते : इलियास ढोकले
हिंदवी स्वराज्याची राजधानी असणाऱ्या किल्ले रायगडावर मागील आठ दिवसापासून छत्रपतींच्या राजदरबारासह समाधीस्थळ व राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब यांची समाधी असलेला परिसर हा पूर्णपणे अंधारात असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.
या संदर्भात येथील स्थानिक व्यावसायिक व प्रामुख्याने गेल्या दोन तीन पिढ्यांपासून किल्ले रायगडावर येणाऱ्या शिवभक्तांची सेवा करणाऱ्या शिवभक्त रघुवीर देशमुख यांनी यासंदर्भात व्यक्त केलेल्या भावनांशी हिंदुस्थानातील शिवभक्त सहमत राहतील यामध्ये कोणतीही शंका नाही.
मागील सुमारे आठ ते दहा दिवसांपासून हिंदवी स्वराज्याची राजधानी असणाऱ्या किल्ले रायगडाचा राज दरबार व समाधी स्थळावरील वीज पुरवठा खंडित झाल्याने समाधी स्थळावर कार्यरत असलेल्या पोलिसांना अंधारात आपली सेवा बजावावी लागत असल्याचे सांगण्यात आले. तसेच ज्या राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब यांच्यामुळे हिंदवी स्वराज्याची स्थापना शक्य झाली, त्यांचा पाचाड येथील समाधी परिसर देखील हॅलोजन बंद असल्याने अंधारात असल्याचे वृत्त समोर आल्याने स्थानिक शिवभक्तांसह संपूर्ण राज्यातील शिवभक्त संघटनांनी केंद्रीय पुरातत्त्व विभाग विरोधात आपला तीव्र संताप व्यक्त केला आहे.
यासंदर्भात केंद्रीय पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा दूरध्वनी उचलला न गेल्याने यासंदर्भात पुरातत्व विभागाची असलेली भूमिका स्पष्ट होऊ शकली नाही. यासंदर्भात महाड विद्युत वितरण विभागाचे उपकार्यकारी अभियंता सतीश गढरी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी विद्युत पुरवठा सुरळीत सुरू असून या तिन्ही ठिकाणचे हॅलोजन दिवे बंद पडल्याने सदर ठिकाणी विद्युत पुरवठा होत नसल्याचे निदर्शनास आणले.
या संदर्भातील सोशल मीडियावर प्राप्त झालेल्या व्हिडिओ नंतर तातडीने संबंधित विभागाचे अभियंता श्री दिघे यांना याबाबतची खातर जमा करण्याचे आदेश दिले होते. त्यांनी या संदर्भातील वस्तुस्थिती आपणास स्पष्ट केल्याची ही माहिती त्यांनी दिली. हिंदवी स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडाचे असलेले महत्त्व लक्षात घेऊन विद्युत मंडळाने या संदर्भात नियमितपणे तपासणीची व्यवस्था केल्याची ही माहिती उपकार्यकारी अभियंता श्री सतीश गढरी यांनी याप्रसंगी दिली.
या संदर्भात स्थानिक शिवभक्त व व्यावसायिक रघुवीर देशमुख यांनी केंद्रीय पुरातत्व विभागाच्या कार्यपद्धती विरोधात तीव्र संताप व्यक्त करून किल्ले रायगडावर २४ तास अखंड दीप तेवत ठेवण्याची जबाबदारी या विभागाची असताना ज्या ठिकाणी संपूर्ण देशाला मार्गदर्शन झाले ती जागा गेल्या आठ ते दहा दिवसापासून अंधारात असल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करून शासनाने या विभागासंदर्भात तातडीने कार्यवाही करावी अशी मागणी केली.