कोप्रोली (उरण) : ऋतूचक्रात मोठा बदल होत आहे. हवामान बदलाचे गंभीर परिणाम, गेल्या काही वर्षांपासून निसर्गाच्या चक्रात मोठे बदल दिसून येत आहेत. अनियमित पाऊस, थंडीच्या काळात उष्णता आणि उन्हाळ्यात अवकाळी पाऊस अशा विचित्र हवामानामुळे शेती आणि जनजीवन विस्कळीत झाले आहे. जागतिक तापमान वाढीचा हा परिणाम असून, भविष्यात याचे अधिक गंभीर परिणाम होण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे.
बदलणाऱ्या पावसाच्या चक्रामुळे रायगड जिल्ह्यातील भातशेती आणि बागायती शेतीवर मोठा वाईट परिणाम होईल असे शेतकरी सांगतात. पूर्वी पावसाचा कालावधी निश्चित होता. आता कधीही पाऊस पडतो. थंडी कधीपासून सुरू होते आणि कधी संपते? यावर्षी दिवाळीतही उन्हाळ्यासारखी उष्णता जाणवली. जागतिक तापमान वाढ, जंगलतोड, प्रदूषण, औद्योगिकीकरण, कार्बन उत्सर्जन ही कारणे आहे.
या वर्षी शेतकऱ्यांवर तर प्रथम पिकांचे नुकसान, पेरणी आणि काढणीच्या वेळा बदलणे, शेतीचे चक्र बिघडले होते तसेच मळणीच्या वेळी तर पावसाचा हाहाकार यामुळे तयार झालेले शेत माल पाण्याखाली जाण्याचे प्रकार वाढले त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसानीला सामोरे जावे लागले आहे.
पर्यावरणाचा विचार केला तर वन्यजीवनावर परिणाम, पाण्याची पातळी कमी होणे, रोगराई वाढणे असे प्रकार भविष्यात वाढण्याचे संकेत मिळत आहेत. निसर्गाचे बदललेले चक्र म्हणजे हवामान बदलामुळे नैसर्गिक वातावरणातील नियमित चक्रांमध्ये होणारे बदल. या बदलांमुळे अनेक नैसर्गिक क्रिया आणि घटनांवर परिणाम होत आहे.
जलचक्र: हवामान बदलामुळे नैसर्गिक जलचक्रात बदल होत आहेत. यामुळे काही ठिकाणी अतिवृष्टी होते, तर काही ठिकाणी दुष्काळ पडणे. चक्रीवादळे: मानवी हस्तक्षेपामुळे आणि जागतिक तापमानवाढीमुळे चक्रीवादळांची संख्या आणि तीव्रता वाढली आहे. ’निसर्ग’ चक्रीवादळ हे याचेच एक उदाहरण आहे, जे महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर धडकले होते. जैवविविधता: नैसर्गिक चक्रातील बदलांमुळे जैवविविधतेवर मोठा दबाव येत आहे.
यावर उपाययोजना म्हणून नागरिकांनी प्लास्टिकचा मोठ्या प्रमाणात होणारा वापर टाळणे, मोठ्याप्रमाणात झाडे लावणे, ती जगवणे तसेच जंगल तोडीवर पूर्ण पणे बंदी, तर शासनाने पर्यावरण वाचविण्यासाठी कठोर धोरण अवलंबिले पाहिजेत, विकासाच्या नावाने मोठ्या प्रमाणात जंगलतोड केली जाते ती वेळीच शासनाला थांबवता आली पाहिजेत.
माझ्या 65 वर्षांच्या आयुष्यात मी असा बदल कधीच पाहिला नाही. हे बदल मानवी हस्तक्षेपामुळे घडत आहेत, ज्यामुळे पर्यावरणाचे संतुलन बिघडण्याची शक्यता आहे.काशीराम पाटील, शेतकरी, कोप्रोली