Agriculture News Pudhari
रायगड

Raigad Farmer Loan Waiver: जिल्ह्यातील १,३७४ पात्र कर्जमुक्त शेतकऱ्यांची दुसरी यादी जाहीर; गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येला सुखद वार्ता, शेतकरी सुखावले

रायगड जिल्ह्यातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६ची दुसरी यादी जाहीर झाली असून १,३७४ शेतकऱ्यांचा समावेश आहे. पात्र शेतकऱ्यांना दोन लाखांपर्यंत कर्जमुक्तीचा लाभ मिळणार आहे.

पुढारी वृत्तसेवा

रायगड: महाराष्ट्र शासनाने २ जून २०२६रोजीच्या शासन निर्णयान्वये ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-2026’ सुरू केली आहे. या योजनेंतर्गत रायगड जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांची दुसरी यादी आज प्रसिद्ध करण्यात आली असून, त्यामध्ये १ हजार ३७४ पात्र शेतकऱ्यांचा समावेश आहे.गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येलाच ही सुखद वार्ता आल्याने शेतकरी सुखावले आहेत.

या योजनेअंतर्गत१ एप्रिल २०११ ते ३० सप्टेंबर २०२५ या कालावधीत वितरित झालेली व ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत थकीत असलेली तसेच ३१ मार्च २०२६ पर्यंत परतफेड न झालेली पीक कर्जे आणि पुनर्गठित अथवा फेरपुनर्गठित कर्जांना दोन लाखांपर्यंत कर्जमुक्तीचा लाभ देण्यात येणार आहे.

योजनेची अंमलबजावणी ऑनलाईन संगणकीय प्रणालीद्वारे करण्यात येत असून, शासनाने यासाठी महाआयटीची नियुक्ती केली आहे. महाआयटीने तयार केलेल्या योजना पोर्टलवर रायगड जिल्ह्यातील बँकांनी एकूण १२ हजार ६८२ थकीत कर्जखात्यांची माहिती अपलोड केली आहे. संगणकीय संस्करणानंतर आतापर्यंत ७हजार३६७ पात्र लाभार्थ्यांची पहिली यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.

हिल्या यादीतील रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आधार प्रमाणीकरण झालेल्या शेतकऱ्यांपैकी ३ हजार ३९२ पात्र लाभार्थ्यांना २० कोटा ४६ लाख रुपयांचा कर्जमुक्तीची रक्कम त्यांच्या कर्जखात्यात जमा करण्यात आली आहे. उर्वरित कर्जखात्यांचे प्रमाणीकरण व संबंधित कार्यवाही सुरू आहे.

योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांची दुसरी यादी ११ सप्टेंबर २०२६ रोजी शासनाकडून प्रसिद्ध करण्यात आली असून, त्यामध्ये १ हजार ३७४ शेतकऱ्यांचा समावेश आहे. या यादी संबंधित बँक शाखा, विकास संस्था तसेच ग्रामपंचायतीमध्ये प्रसिद्ध करण्यात येणार आहे. ही यादी कर्जमुक्तीची यादी असून, यामधील पात्र शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्तीचा लाभ देण्यात येणार आहे.

यादीतील शेतकऱ्यांच्या कर्जबाकीची रक्कम ३१ मार्च २०२६ रोजीची ग्राह्य धरण्यात येणार आहे. ०१एप्रिल २०२६ नंतरचे व्याज व इतर खर्च माफ करण्यात येणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी कर्ज थकबाकीची खातरजमा करून आपले सेवा केंद्रावर जाऊन आधार प्रमाणीकरण करावे असे आवाहन केले आहे.

हेअर कट धोरणाचा लाभ

पात्र शेतकऱ्यांच्या३१ मार्च २०२६ रोजीच्या कर्ज थकबाकीची रक्कम २ लाखांपेक्षा जास्त असली, तरी शासनाच्या ‘हेअर कट’ धोरणानुसार संबंधित कर्जखाती निरंक करण्यात येणार आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT