रायगड : अतुल गुळवणी
रायगडात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे पडघम वाजायला सुरुवात झालेली आहे. राजकीय पक्षांनीही मोर्चेबांधणी सुरु केलेली आहे. शनिवारी (दि.2) रोजी रायगडात शेकापचा वर्धापनदिन सोहळा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा पक्षप्रवेश सोहळा असे दोन कार्यक्रम पार पडले.
शेकापच्या मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची तोफ धडाडली तर राष्ट्रवादीच्या मेळाव्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांनी बेरजेचे राजकारण करण्याचा प्रयत्न केला.या दोन्ही नेत्यांच्या दौर्याने रायगडातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत नवी समिकरणे निर्माण होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.त्याचा फायदा नेमक्या कोणत्या पक्षांना होतो हे निकालांती दिसून येईल.
दरवर्षी शेकापचा 2 ऑगस्टला वर्धापनदिन सोहळा जिल्ह्यात साजरा केला जातो.यावेळी पनवेलमध्ये पक्ष फुटीच्या पार्श्वभूमीवर माजी आ.बाळाराम पाटील यांच्या नेतृत्वाखाली पक्षाचा मेळावा आयोजित करण्यात आला होता.शेकाप नेते जयंत पाटील यांनी आपले राजकीय कौशल्य वापरत प्रथमच या मेळाव्याला मनसे अध्यक्ष राज ठाकरे,शिवसेना(ठाकरे) खा .संजय राऊत,राष्ट्रवादी ( शप) प्रदेशाध्यक्ष आ.शशिकांत शिंदे असा मेळ जमवून आणला होता.गेल्या महिन्यात मुंबईत झालेल्या हिंदीला विरोध करण्यासाठी आयोजित केलेल्या राज ठाकरेंच्या मेळाव्यास जयंत पाटील हे आवर्जून उपस्थित राहिले होते.त्याचा पैरा राज ठाकरे यांनी मेळाव्यास उपस्थित राहून फेडला हे नक्की.या मेळाव्यात राज ठाकरेंचे दणक्यात भाषण झाले.नेहमीच्या शैलीत त्यांनी भाजपवर निशाणा साधताना सांगेन गोष्टी युक्तीच्या चार असा सांगत जमिनी विकू नका, विकल्या तर संबंधित प्रकल्पाचे भागीदार व्हा असा सल्ला दिला.शिवाय लालबावट्यात भगवे वादळ मिसळले असे जाहीर करत आगामी काळात रायगडात नवीन समिकरणे निर्माण होऊ शकतात असे संकेतही दिले.
अर्थात नेते जरी व्यासपीठावर आले असले तरी दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते कितपत एकत्र येतात हे पहाणे इष्ट ठरणार आहे.राज ठाकरेंच्या सभेचा शेकापला कितपत फायदा होतो हे आगामी काळात दिसून येणार आहे. निदान भाजप विरोधकांची मुठ आणखी घट्ट होत आहे हे नाकारता येत नाही. रायगडात मनसेचे अस्तित्वही जे काही आहे ते ठराविक तालुक्यापुरतेच मर्यादित आहे.यामुळे आगामी काळात जर पक्षसंघटना पुन्हा उभी करायची असल्यास नवीन मित्र जोडावे लागणार आहेत.यासाठी आता रायगडात शेकापसमवेत मनसे एकत्र आली तर त्याचा फायदा दोन्ही पक्षांना निश्चित होऊ शकेल.यासाठी स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यार्ंमध्ये मनोमिलन होणे गरजेचे आहे.तसे झाले तर फायदा होईल.
उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांनी शनिवार रायगडसाठीच राखून ठेवला होता. माणगावमध्ये शिवसेना (शिंदे नेते गट) अॅड.राजीव साबळे आणि अलिबागमध्ये माजी आ.मधूकर ठाकूर यांचे पूत्र अॅड.प्रविण ठाकूर यांचा पक्षप्रवेश सोहळा दादांच्या उपस्थितीत करण्यात आला.अर्थात या पक्षप्रवेश सोहळ्याचे खरे सुत्रधार खा. सुनील तटकरे हेच आहेत.त्यांनी रायगडातील काँग्रेस संपविण्याचाच पण केला आहे.त्यामुळे त्यांनी प्रविण ठाकूर यांना घड्याळ बांधायला दिले.पण घड्याळ बांधताना त्यात तटकरे नामक सेल टाकायला ते विसरले नाहीत.प्रविण ठाकूर यांचे राजकीय अस्तित्वही यानिमित्ताने दिसून येणार आहे.त्याचा फायदा राष्ट्रवादीला कितपत होतो हे सुद्धा समजणार आहे.
माणगावमध्ये अॅड.राजीव साबळे यांचे रोहयो मंत्री भरतशेठ गोगावले यांच्याशी बिनसले.त्यामुळे राजकीय अस्तित्वासाठी त्यांनी तटकरे साहेबांशी मिळते जुळते घेत राष्ट्रवादीचा दुपट्टा आपल्या गळ्यात घालून घेतला.राजीव साबळे यांचे माणगाव नगरपंचायतीत अस्तित्व आहे.शिवाय माजी आ.अशोक साबळे यांनी तयार केलेले ऋणानुबंधही त्यांना उपयोगी पडू शकतात.शिक्षण संस्था,सहकारी संस्थांच्या माध्यमातून निर्माण झालेले कार्यकर्त्यांचे जाळेही साबळे यांच्या पाठीशी निश्चित आहे.एवढे असूनही राजीव साबळे यांना राजकारणात अपेक्षित यश संपादित करता आलेले नाही.याचे मुख्य कारण म्हणजे राजकीय धरसोड वृत्ती.यापूर्वी ते काँग्रेस,शेकापमध्ये होते.एकसंघ शिवसेना असताना त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूकही लढविली. माणगावमधून जि.प.वर सदस्य म्हणूनही कार्यरत होते.काहीकाळ जि.प.सभापतीही होते. पण सततच्या धरसोड वृत्तीने राजकीय अस्तित्व डळमळीत झाले हे नाकारता येणार आहे. यापूर्वी साबळे पितापुत्रांनी सुनील तटकरे यांच्याशी अनेकदा पंगा घेतला होता. काहीवेळा राजकीय तडजोडीही केल्या. पण त्या दोघांना सुनीलशेठ सवाई ठरले हे माणगावच्या जनतेने पाहिलेले आहे.यामुळे राजीव साबळेंनी राष्ट्रवादीचे घड्याळ जरी हाती बांधले असले तरी त्या घड्याळाचे काटे कितपत चालू द्यायचे हे तटकरे यांच्याच हातात राहणार आहे.
ऐन निवडणुकीच्या तोंडावरच या दोन माजी आमदार पूत्रांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला असला तरी याचा फायदा राष्ट्रवादीला कितपत होतो हे आगामी काळात दिसून येणार आहे.तसे झाल्यास अजितदादांचा रायगड दौरा यशस्वी ठरला असेच म्हणावे लागेल.
माणगांव नंतर रोहा येथे टाटा उद्योग समुह , एमआयडीसी आणि रोहा नगर परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने व खा. सुनील तटकरे यांच्या पुढाकाराने टाटा उद्योग समुह संचलित कौशल्यवर्धन केंद्राचे भूमीपूजन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. या केेंद्रातून दरवर्षी 3000 विद्यार्थ्यी रोजगाराभीमुख प्रशिक्षण घेवून बाहर पडणार असून, एमआयडीसी मधील कारखान्यांमध्ये रोजगार उपलब्ध होवू शकणार आहे. रोहा हा खासदार सुनील तटकरे यांचा बालेकिल्लाच मानला जात असून या निमित्ताने तो अधिक मजबूत होणार आहे.