Raigad Drought Relief Pudhari
रायगड

Raigad Drought Relief: रायगडच्या शेतकऱ्यांसाठी हेक्टरी १ लाखांची मागणी; शेतमजुरांनाही २५ हजार रुपये द्या!

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची मागणी; शेतमजुरांना २५ हजार रुपये मदत देण्याची मागणी, आंदोलनाचा इशारा

पुढारी वृत्तसेवा

कमलाकर होवाळ

माणगाव: रायगड जिल्ह्यात पावसाने दीर्घकाळ दडी मारल्याने खरीप हंगामातील भातशेतीचे मोठे नुकसान झाले असून, शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. प्रशासनाने केवळ श्रीवर्धन तालुका दुष्काळग्रस्त घोषित केल्याने उर्वरित तालुक्यांतील शेतकऱ्यांवर अन्याय होत असल्याची भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने घेतली आहे.

संपूर्ण रायगड जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करून शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपये, तर शेतमजुरांना २५ हजार रुपये आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी पक्षाचे श्रीवर्धन विधानसभा अध्यक्ष संताजी पवार यांनी केली आहे.

शासनाने मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष न दिल्यास नजीकच्या काळात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही त्यांनी प्रसिद्धि माध्यमांशी बोलताना दिला.

यंदाच्या हंगामात पावसाच्या अनियमिततेचा मोठा फटका रायगड जिल्ह्यातील भातशेतीला बसला आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीला झालेल्या पावसाच्या भरवशावर शेतकऱ्यांनी भातलागवड पूर्ण केली होती.

रोपांची वाढ समाधानकारक होऊन यंदा चांगले उत्पादन मिळेल, अशी अपेक्षा बळीराजाला होती. मात्र, हंगामाच्या सुरुवातीला पावसाने दिलेली ओढ, त्यानंतर झालेली अतिवृष्टी आणि सप्टेंबरपासून जाणवणारी पावसाची अनियमितता यामुळे शेतीचे नियोजन कोलमडले. आता ऑक्टोबरच्या सुरुवातीपासून पावसाने पुन्हा दीर्घ उघडीप दिल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे.

भात पिकाच्या वाढीच्या आणि दाणे भरण्याच्या निर्णायक टप्प्यावर पाण्याची आवश्यकता असते. मात्र, पावसाने पाठ फिरवल्याने शेतातील पाण्याची पातळी घटली असून जमिनीतील ओलावाही झपाट्याने कमी होत आहे.

परिणामी अनेक ठिकाणी भाताची रोपे पिवळी पडू लागली आहेत, तर काही भागांत पिके करपल्याचे चित्र आहे. दुबार पेरणी करूनही अपेक्षित पाऊस न झाल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित पूर्णपणे बिघडले आहे. वर्षभर शेतीवर अवलंबून असलेल्या शेतकरी कुटुंबां समोर आता उत्पादन घटण्या बरोबरच आगामी आर्थिक गरजा भागविण्याचे आव्हान उभे ठाकले आहे.

बियाणे, खते, औषधे आणि मजुरीवर केलेला खर्च वसूल होण्याची शक्यता धूसर झाली आहे. शेतीतील उत्पन्नावर अवलंबून असलेल्या शेत मजुरांनाही रोजगारा अभावी आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे.

त्यामुळे केवळ पीक नुकसानीचे पंचनामे करून न थांबता बाधित शेतकरी आणि शेतमजुरांना तातडीने आर्थिक आधार देण्याची गरज व्यक्त होत आहे. रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुका दुष्काळग्रस्त घोषित करण्यात आला असताना उर्वरित १४ तालुक्यांतील शेतकऱ्यांनाही दुष्काळसदृश परिस्थितीचा फटका बसत असल्याचा दावा संताजी पवार यांनी केला आहे.

पावसाची उघडीप, पिकांची झालेली हानी आणि शेतकऱ्यां समोरील आर्थिक संकट यांचा विचार करून संपूर्ण जिल्ह्याचा एकत्रित आढावा घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली. प्रत्यक्ष पीक नुकसानीची पाहणी करावी आणि बाधित शेतकऱ्यांना मदतीपासून वंचित ठेवू नये, अशी पक्षाची भूमिका आहे. संपूर्ण रायगड जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करून शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपये, तर शेतमजुरांना २५ हजार रुपये आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी केली आहे.

या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने संबंधित तालुक्यांच्या तहसीलदारांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले आहे. दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी तातडीच्या मदती बरोबरच रोजगार, पाणी आणि चारा व्यवस्थापनाच्या उपाययोजना राबविण्याची मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT