रायगड जिल्ह्यात पावसाचा मुक्काम तब्बल सहा महिने  pudhari photo
रायगड

Raigad heavy rain : रायगड जिल्ह्यात पावसाचा मुक्काम तब्बल सहा महिने

परतीच्या पावसाचा भातशेतीबरोबर अनेक स्थानिक व्यावसायांना फटका

पुढारी वृत्तसेवा

सुधागड ः परतीच्या पावसाचा फटका जिल्ह्यातील भात शेती बरोबरच अनेक व्यवसायांना बसला आहे. यंदा जिल्ह्यात मे महिन्यात पाऊस सुरु झाला आहे आणि ऑक्टोबरच्या अखेरीसही तो मुसळधार कोसळत आहे. त्यामुळे या व्यवसायांना प्रचंड नुकसानीला सामोरे जावे लागत आहे.

पावसाळा लांबल्याने बांधकाम, विकासकामे करणारे, भात गिरणी, वीटभट्टी, कुंभारकाम, सुकी मासळी, मंडप व डेकोरेशन आदी व्यावसायिक हतबल झाले आहेत. लांबलेल्या पावसामुळे हे व्यवसाय अक्षरशः डबघाईला आले आहेत. शेतामध्ये भात पिक डोलू लागले होते. आणि तयार झालेला भात कापणीसाठी शेतकरी देखील सज्ज होते. या हंगामात शेतकरी कापणी करून भात गिरण्यांवर भात भरडण्यासाठी गर्दी करतात, मात्र तयार झालेला भात शेतात पाण्यात आडवा पडल्यामुळे आता शेतकऱ्यांचे तर नुकसान झालेच, मात्र भात गिरणी व्यवसायाचे देखील नुकसान झाले आहे.

कुंभारकाम व्यवसायिक म्हणाले की परतीच्या पावसामुळे मडकी, चुली व मातीच्या इतर वस्तू आणि मातीची खेळणी खराब झाल्या आहेत. शिवाय पाऊस आणि गारवा असल्याने मडकी व चुलींची विक्री देखील थांबली आहे. शिवाय ऐन दिवाळीच्या हंगामात पाऊस असल्यामुळे पणती विक्रीलाही त्याचा फटका बसला. मातीच्या वस्तू भाजण्यासाठी लागणारा पेंढा, लाकडे व कोळसा देखील भिजला आहे. त्यामुळे भट्टी लावणे अवघड झाले आहे. माती भिजल्याने ती पुन्हा वापरता येणार नाही. मालाला उठाव सुद्धा मिळत नाही.

सुधागड तालुक्यातील मंडप व डेकोरेशन व्यवसाईक सखाराम साजेकर म्हणाले की मे महिन्यात ऐन हंगामात पाऊस सुरु झाल्याने प्रचंड नुकसान झाले. शिवाय कापड, पडदे, इलेक्ट्रिक व डेकोरेशनचे सामान भिजून खराब झाले. सध्या लगीन सराई व सार्वजनिक आणि राजकीय कार्यक्रम सुरू होतील. पण ऐनवेळी कोसळणाऱ्या परतीच्या पावसामुळे काही ऑर्डर रद्द झाल्या आहेत. अचानक पाऊस कोसळत असल्याने धास्ती वाटते, असे देखील ते म्हणाले.

बांधकाम व्यवसायावर गदा

जिल्ह्यात बांधकाम व्यवसाय व फार्म हाऊस व इतर विकसक व्यवसाय वाढत चालला आहे. नवनिर्माणाची कामे देखील काही प्रमाणात होतांना दिसत आहेत. मात्र स्लॅब टाकणे, वीट काम करणे, भराव किंवा उत्खनन करणे, रंगकाम करणे आदी कामांना परतीच्या पावसामुळे प्रचंड अडथळा येत आहे. त्यामुळे ही काम पूर्ण होत नाही. पालीतील ग्रीन टच नर्सरीचे मालक अमित निंबाळकर यांनी सांगितले की विविध ठिकाणी गार्डनिंगची आणि विकसकाची कामे सुरू आहेत, मात्र ऐनवेळी येणाऱ्या परतीच्या पावसामुळे सर्व कामे खोळंबतात आणि नुकसानही होते.

सुकी मासळी व्यावसायिकांचे नुकसान

सुधागड तालुक्यातील पेडली येथील सुकी मासळी विक्रेते सुनील कोळी यांनी सांगितले की यंदा मे महिन्यातच पावसाला सुरुवात झाली आणि याचवेळी सुकी मासळीचा व्यवसाय तेजीत असतो. त्यामुळे मे महिन्यात मोठ्या प्रमाणात माल भरून ठेवला होता. मात्र अवकाळी पाऊस सुरू झाल्याने सर्व माल खराब झाला परिणामी नुकसानीला सामोरे जावं लागले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT