Education Pudhari
रायगड

रायगड जिल्ह्यात प्राथमिक शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी ठोस पावले; १०० दिवसांचा कृतीआराखडा जाहीर

पुढारी वृत्तसेवा

सुवर्णा दिवेकर

अलिबाग : रायगड जिल्हा परिषद अंतर्गत प्राथमिक शिक्षणाची गुणवत्ता वाढवण्यासाठी व्यापक आणि ठोस उपाययोजना राबवण्याचा निर्धार शिक्षण समितीचे सभापती चंद्रकांत कळंबे यांनी व्यक्त केला. प्राथमिक शाळांमधील विद्यार्थ्यांचा शैक्षणिक पाया भक्कम करण्यासोबतच शिक्षकांच्या विविध समस्या सोडवण्यावरही भर दिला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

या पार्श्वभूमीवर अलिबाग तालुक्यातील वरसोली येथील राजिप शाळेत जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षक संघटनांचे अध्यक्ष व सचिव यांची महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत शिक्षण क्षेत्रातील विविध प्रश्नांवर सखोल चर्चा होऊन काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.

बैठकीस जिल्हा परिषद अध्यक्ष मंगेश वाकडीकर, उपाध्यक्ष मधुकर पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, कृषी व पशुसंवर्धन समितीचे सभापती वैकुंठ पाटील, तसेच शिक्षण अधिकारी ललिता दहितुले यांच्यासह अनेक अधिकारी उपस्थित होते. त्यांनी मार्गदर्शन करत शिक्षण व्यवस्थेत सुधारणा घडवून आणण्यासाठी एकत्रित प्रयत्नांची गरज अधोरेखित केली.

महत्त्वाचे निर्णय :

बैठकीत प्रमुख मुद्द्यांवर चर्चा करून निर्णय घेण्यात आले.

* सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षात सर्व प्राथमिक विद्यार्थ्यांना वाचन, लेखन आणि गणितात निपुण करण्याचा संकल्प

* शिक्षकांनी वेळेवर शाळेत उपस्थित राहून शिस्तीचे पालन करणे

* अप्रगत विद्यार्थ्यांसाठी १६ जूनपासून १०० दिवसांचा विशेष शैक्षणिक उपक्रम राबविणे

* जून २०२६ पासून प्राथमिक शिक्षकांसाठी ‘डेसकोड’ प्रणाली लागू करणे

* शिक्षकांच्या प्रलंबित प्रशासकीय व आर्थिक समस्या तातडीने सोडविण्यावर भर

यामध्ये वरिष्ठ वेतनश्रेणी, निवडश्रेणी प्रस्ताव, उच्च शिक्षण परवानगी, वैद्यकीय बिलांचे निपटारे, सेवा जोड प्रस्ताव तसेच विविध पदोन्नती प्रकरणांचा आढावा घेण्यात आला.

शिक्षक संघटनांच्या मागण्या

राज्य शिक्षक संघटनेचे अध्यक्ष राजेश सुवे यांनी शिक्षकांच्या हिताच्या काही महत्त्वाच्या मागण्या मांडल्या. त्यामध्ये मुख्यालय सूट, उर्दू शिक्षकांसाठी स्वतंत्र ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’, जिल्हा परिषद स्तरावरील प्रकरणे निश्चित कालावधीत मंजूर करणे तसेच सेवानिवृत्त शिक्षकांचा सन्मान करून त्यांना त्याच दिवशी पेन्शन मंजुरी आदेश देण्याची मागणी करण्यात आली. या बैठकीला जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागातील अधिकारी, कर्मचारी, गटशिक्षणाधिकारी तसेच विविध शिक्षक संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते .एकूणच, रायगड जिल्ह्यात प्राथमिक शिक्षणाची गुणवत्ता उंचावण्यासाठी प्रशासन व शिक्षक संघटना एकत्रितपणे काम करण्यास सज्ज असल्याचे या बैठकीतून स्पष्ट झाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT