अलिबाग : रायगड जिल्ह्यात मागील 11 महिन्यात 18 वर्षाखालील 70 अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्याची गंभीर आणि तितकीच चिंताजनक बाब समोर आली आहे. 1 जानेवारी ते 30 नोव्हेंबर या काळातील घटना जिल्ह्यातील 21 पोलीस ठाण्यांच्या हद्दीत घडल्या आहेत. मुली बेपत्ता होण्याच्या घटनांमुळे त्यांच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून पालकांच्या चिंतेत वाढ झाली आहे.
प्रशासनाने पालकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे तर पोलीस यंत्रणेला मुलींच्या सुरक्षिततेसाठी विशेष उपाययोजना करायला सांगितले आहे. मुलींच्या बेपत्ता होण्याची वेगवेगळी कारणे समोर आली आहेत. बदलती जीवनशैली अणि वाढते नागरीकरणे यामुळे मुलामुलींच्या मानसिकतेवर होणारा परीणाम यामागचे प्रमुख कारण सांगितले जाते. पालकांनी मोबाईलवरून टोकणे किंवा अभ्यासावरून रागावल्याने मुलं टोकाचे पाऊल उचलून घर सोडतात. अनेकदा मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून पळवून नेण्याचे प्रकार समोर येत आहेत. काही दिवसांनी मुली स्वतःहून तर काही प्रकरणात पोलीस आणि पालकांच्या शोधानंतर परत आल्या आहेत.
रायगड जिल्ह्याचा विचार केला तर मुली बेपत्ता होण्याचे सर्वाधिक प्रमाण हे खोपोली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे. खोपोलीतून 11 मुली मागील 11 महिन्यात बेपत्ता झाल्या आहेत. ही आकडेवारी चिंताजनक असून पालकांनी मुलींवर अधिक लक्ष ठेवावे, मुलींना सुरक्षित वातावरण उपलब्ध करून द्यावे, तसेच शाळा, समाजिक संस्थांनी देखील सतर्क राहावे, असे पोलीस प्रशासनाने सांगितले आहे. पोलिसांनी बेपत्ता मुलींचा शोध घेण्यासाठी तपास मोहीम वाढवली असून, नागरिकांनी कुठल्याही संशयास्पद परिस्थितीची माहिती त्वरित स्थानिक पोलीस ठाण्याला देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
पोलीस ठाणेनिहाय मुलींची संख्या
खोपोली 11, खालापूर 4, कर्जत 5, नेरळ 3, रसायनी 7, अलिबाग 5, रेवदंडा 4, मांडवा 2, पेण 6, महाड तालुका 1, एमआयडीसी 2 , रोहा 2, कोलाड 2, नागोठणे 1, माणगाव 6, गोरेगाव 1, श्रीवर्धन 1, मुरूड 1, पाली 4, पोलादपूर 1, म्हसळा 1, एकूण 70.
जिल्हयातील बेपत्ता अल्पवयीन मुलींचा शोध पोलिस प्रशासन घेत असून बेपत्ता मुलींपैकी अनेक मुली सापडल्या देखील आहेत. त्यांना सुरक्षितपणे पालकांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.अभिजित शिवथरे अप्पर पोलीस अधीक्षक