Raigad flood alert 
रायगड

Raigad flood alert : रायगडात धरणे तुडुंब; चार नद्या इशारा पातळीपुढे, प्रशासन सतर्क

Maharashtra heavy rain update: काळ नदीची पाणीपातळीही वाढत असून तिच्यावर सातत्याने लक्ष ठेवण्यात येत आहे

पुढारी वृत्तसेवा

अलिबाग : रायगड जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणांबरोबरच प्रमुख नद्यांच्या पाणीपातळीतही मोठी वाढ झाली आहे. रायगड पाटबंधारे विभागाच्या ६ जुलैच्या अहवालानुसार जिल्ह्यातील बहुतांश लघुपाटबंधारे धरणे १०० टक्के भरली असून फणसाड, वावा, सुतारवाडी, आंबेघर, कोंडगाव, घोटवडे, मोरबे यांसह अनेक धरणे पूर्ण क्षमतेने भरली आहेत.

दरम्यान, महाड येथील सावित्री, रोहा येथील कुंडलिका, नागोठणे येथील अंबा आणि रसायनी येथील पाताळगंगा या नद्यांनी इशारा पातळी ओलांडल्याने प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. काळ नदीची पाणीपातळीही वाढत असून तिच्यावर सातत्याने लक्ष ठेवण्यात येत आहे.

घोटवडे येथे सर्वाधिक ३९१ मिमी, ढोकशेत येथे ३५५ मिमी, उन्हेरे येथे २९२ मिमी आणि कवळे येथे २९१ मिमी पावसाची नोंद झाली आहे. भिरा परिसरातही २९४ मिमी पाऊस झाला असून धरणातील पाणीपातळी वाढल्याने आवश्यकतेनुसार विसर्ग सुरू आहे. जिल्हा प्रशासन, महसूल, पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सतर्क असून नागरिकांनी नदीपात्रात जाणे, पूल व बंधाऱ्यांवर गर्दी करणे टाळावे तसेच प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT