पनवेल ः अज्ञात सायबर टोळीने एका पोलीस कर्मचार्याला 55 लाखांचा गंडा घातल्याचे प्रकरण समोर आले आहे. सोशल मीडियावर आलेल्या बनावट गुंतवणूक जाहिरातीवर विश्वास ठेवून ही फसवणूक घडल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे. या प्रकरणी नवी मुंबईच्या सायबर पोलिसांनी अज्ञात सायबर टोळीविरोधात गुन्हा दाखल करून त्यांचा शोध सुरू केला आहे.
हे पोलीस कर्मचारी त्यांच्या कुटुंबासह खारघर परिसरात राहत असून, ते मुंबई पोलीस दलात संरक्षण शाखेत कार्यरत आहेत. गेल्या 15 जानेवारी रोजी त्यांना फेसबुकवर 18 हजार रुपये गुंतवल्यास दररोज 1200 रुपयांचा नफा मिळेल, अशी मुकेश अंबानी यांच्या नावाने गुंतवणुकीबाबतची एक जाहिरात निदर्शनास आली. त्यावर त्यांनी या जाहिरातीच्या लिंकवर जाऊन त्यात मोबाईल क्रमांक नोंदवला. त्यावर आशिष मिश्रा या व्यक्तीने फिन ब्रिज कॅपिटल या कंपनीचा अॅडव्हायझर असल्याचे भासवून या पोलिसाला संपर्क साधत त्यांना सुरुवातीला 22 हजार रुपये गुंतवणूक केल्यास चांगला नफा मिळेल, असे सांगितले असता त्यांनी 19,500 रुपयांची गुंतवणूक केली. त्यावर या टोळीने त्यांना नफ्याचे बनावट स्क्रिन शॉट पाठवले. त्यानंतर नफा मिळतोय या आशेने या पोलिसाने दुसर्या गुंतवणुकीच्या प्लॅनमध्ये साडेतीन लाख रुपये भरले.
या गुंतवणुकीवर त्यांना 83 लाख 96 हजार रुपये नफा झाल्याचे भासवण्यात आले. त्यानंतर त्यांच्याकडून आणखी पैशांची मागणी केली. ही रक्कम भरल्यानंतर या टोळीने त्यांना बार्कलेस बँकेच्या नावाने बनावट पावत्याही पाठवल्या. मात्र परतावा मिळत नसल्याने या प्रकरणात आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले.
सायबर गुन्हेगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. रायगड जिल्हयात सायबर गुन्हेगार कुठे ने कुठे नागरीकांना फसवत आहेत. पनवेलसारख्या शहरी भागातीत सायबर गुन्ह्यांचे प्रमाण अधिक आहे. विशेष म्हणजे सुशिशित नागरिकही आमिषाला बळी पडून आपली फसवणूक करून घेत आहेत.