molestation case Pudhari
रायगड

Raigad Crime: महिला,बालकांवरील अत्याचाराच्या घटनांत वाढ

रायगड जिल्ह्यात वर्षभरात 'पोक्सो' अंतर्गत ११५ गुन्हे दाखल

पुढारी वृत्तसेवा

रायगड: पेण मध्ये अल्पवयिन बालिकेवर अत्याचार करुन तीच निर्दय़ीपणे खून केल्याची घटना मंगळवारी समोर आल्यावर जिल्ह्यातील महिला व बालकांवरिल अत्याचाराच्या गुन्ह्यांची समस्या पून्हा एकदा ऐरणीवर आली आहे.

रायगड जिल्ह्यात सन २०२५ मध्ये महिला आणि बालकांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाल्याचे पोलीस दलाच्या वार्षिक गुन्हेगारी अहवालातून समोर आले आहे.

वर्षभरात जिल्ह्यात लैंगिक अत्याचाराचे एकूण १३६ गुन्हे दाखल झाले असून, चिंताजनक बाब म्हणजे यातील तब्बल ११५ गुन्हे अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराचे म्हणजेच 'पोक्सो' कायद्यांतर्गत नोंदवले गेले आहेत. गतवर्षीच्या तुलनेत या पोक्सो गुन्ह्यांमध्ये २८ गुन्ह्यांची वाढ झाली आहे, मात्र पोलिसांनी या सर्व ११५ गुन्ह्यांची १०० टक्के उकल करण्यात यश मिळवले आहे.

महिलांच्या विनयभंगाच्या घटनांमध्येही वाढ झाली असून वर्षभरात जिल्ह्यात एकूण १५६ विनयभंगाचे गुन्हे दाखल झाले आहेत. तसेच सन २०२५ ते एप्रिल २०२६ या १६ महिन्यांच्या

एकत्रित कालावधीत विनयभंगाच्या आणखी १२५ हून अधिक गुन्ह्यांची स्वतंत्र नोंद झाली आहे. याच कालावधीत जिल्ह्यात एकूण ३२ खुनाचे गुन्हे दाखल झाले असून, त्यापैकी ३० गुन्हे उघडकीस आणण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग आणि स्थानिक पोलिसांना यश आले आहे.

अल्पवयीन मुलींवर अत्याचार करून त्यांचा खून केल्याच्या अत्यंत गंभीर आणि क्रूर स्वरूपाच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर माहिती घेतली असता, सुदैवाने २०२५ आणि चालू वर्षाच्या जून महिन्यापर्यंत रायगड जिल्ह्यात अशा एकाही एकत्रित 'बलात्कार आणि खून' गुन्ह्याची नोंद झालेली नव्हती, मात्र आजच पेण मध्ये पहिला गुन्हा दाखल झाला आहे.

जिल्ह्यात घडलेले खुनाचे ३२ गुन्हे आणि पोक्सोचे ११५ गुन्हे हे वेगवेगळ्या कौटुंबिक, सामाजिक वा वैयक्तिक कारणांतून व वेगवेगळ्या घटनांमध्ये घडले आहेत.

बालकांवरील अत्याचार रोखण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून जिल्ह्यातील विविध शाळा-महाविद्यालयांमध्ये सातत्याने जनजागृती मोहीम राबवली जात आहे. सध्या 'दामिनी पथक' आणि 'निर्भया पथक' अधिक सक्रिय करण्यात आले असून संशयित हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे.

पोक्सो कायद्यांतर्गत दाखल झालेल्या गुन्ह्यांचा तपास जलदगतीने करून आरोपींना कठोर शिक्षा होण्यासाठी न्यायालयात भक्कम पुरावे सादर करण्यावर पोलिसांकडून विशेष भर दिला जात आहे.

पोक्सो अंतर्गत दाखल होणाऱ्या बहुतांश गुन्ह्यांमध्ये अत्याचार करणारी व्यक्ती ही पीडितेच्या परिचयाची, शेजारील किंवा नातेसंबंधातीलच असते. बदलत्या कौटुंबिक व्यवस्थेत पालकांचा मुलांशी कमी झालेला संवाद, दोघेही नोकरीनिमित्त बाहेर असल्याने मुलांवरील देखरेखीचा अभाव आणि मुलांमध्ये असणारी लैंगिक साक्षरतेची कमतरता यामुळे अशा घटनांना वाव मिळतो. इंटरनेटवर सहज उपलब्ध होणारी अश्लील सामग्री आणि त्यामुळे किशोरवयीन मुलांमध्ये तयार होणारी विकृत मानसिकता तरुणाईला चुकीच्या मार्गावर घेऊन जात आहे. याशिवाय, वाढती व्यसनाधीनता आणि नैतिक मूल्यांचा ऱ्हास ही देखील यामागील प्रमुख कारणे मानली जातात.

का वाढताहेत बालकांवरील अत्याचाराच्या घटना?

महिला आणि विशेषतः अल्पवयीन मुला-मुलींवरील अत्याचार वाढण्यामागे बदलती सामाजिक परिस्थिती, तांत्रिक स्थित्यंतरे आणि मानसिक विकृती कारणीभूत असल्याचे सामाजिक व मानसोपचार तज्ज्ञांचे मत आहे.

अलिकडच्या काळात रायगड जिल्ह्याचे झपाट्याने होणारे शहरीकरण, औद्योगिकीकरण आणि वाढत्या दळणवळणामुळे बदललेली जीवनशैली पारंपारिक सामाजिक नियंत्रणाला सैल करत आहे. मोबाईल आणि इंटरनेटच्या वाढत्या अतिवापरामुळे अल्पवयीन मुलांमध्ये भ्रामक आकर्षणाचे जाळे तयार होत असून, सोशल मीडियाच्या माध्यमातून होणारी ओळख आणि फसवणूक अनेकदा अशा गंभीर गुन्ह्यांमध्ये पर्यवसित होत असल्याचे दिसून येते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT