रोहे: मध्य रेल्वेच्या दक्षता पथकाने एका महत्त्वपूर्ण कारवाईत, रेल्वे बोर्डाचा दक्षता निरीक्षक असल्याची खोटी ओळख दाखवून एका रेल्वे कर्मचाऱ्याकडून पैसे मागणाऱ्या एका व्यक्तीला अटक केली आहे. रेल्वे कर्मचाऱ्याकडून प्राप्त माहिती व तक्रारीच्या आधारे मध्य रेल्वेच्या दक्षता पथकाने कारवाईचे नियोजन करून दिनांक २२.०१.२०२६ रोजी कल्याण रेल्वे स्थानकावर सापळा रचला.
या कारवाईदरम्यान तक्रारदाराकडून रु २०,०००/- स्विकारताना हरीश कांबळे याला दक्षता पथकाने रंगेहाथ पकडले. आरोपी हरीश कांबळे याने स्वतःला रेल्वे बोर्डचा दक्षता निरीक्षक असल्याचे भासवून डीआरएम कार्यालय, मुंबई येथील थकीत वेतन मंजूर करून देण्याच्या नावाखाली तक्रारदाराकडून रु २०,०००/- ची मागणी केली होती.
यापूर्वी, आरोपी हरीश कांबळे याने तक्रारदाराकडून बदलीसाठी ६०,०००/- रुपये घेतल्याचा आरोप आहे, जी रक्कम ऑनलाइन पे करण्यात आली होती, परंतु बदली झालीच नाही. आरोपीने पुन्हा तक्रारदाराशी संपर्क साधून थकीत रकमेची लवकर परतफेड करून देण्याची ऑफर दिली. काहीतरी गैरप्रकार होत असल्याचा संशय आल्याने, तक्रारदाराने दक्षता विभागाशी संपर्क साधला आणि त्यानुसार एक कारवाईची योजना आखण्यात आली. श्री हरीश कांबळे याला २०,०००/- रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले आणि पुढील कारवाईसाठी शासकीय रेल्वे पोलीस (जीआरपी), कल्याणच्या ताब्यात देण्यात आले.
फसवणूक व तोतयागिरीच्या आरोपाखाली भारतीय न्याय संहिता अधिनियम, २०२३ (BNS) मधील कलम ३१८(२) व ३१९(२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कलम ३१८(२) अंतर्गत दंड व कमाल ३ वर्षांपर्यंत कारावास, तर कलम ३१९(२) अंतर्गत दंड व कमाल ५ वर्षांपर्यंत कारावास किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. मध्य रेल्वे भ्रष्टाचाराविरुद्ध शून्य सहनशीलतेच्या आपल्या भूमिकेची पुनरुच्चार करत असून, रेल्वे कर्मचारी व सर्वसामान्य नागरिकांनी अशा कोणत्याही फसवणूक अथवा बनावट प्रकारांविषयी सतर्क राहून संबंधित प्राधिकरणांकडे तक्रार नोंदवावी, असे आवाहन करते.