Raigad Crime  smuggling diesel
33 हजार लिटर डिझेलसह 36 लाखांचा मुद्देमाल जप्त pudhari photo
रायगड

Raigad Crime | समुद्रमार्गे डिझेलची तस्करी करणारे चौघे गजाआड

पुढारी वृत्तसेवा

रायगड : अलिबाग तालुक्यातील रेवस जेट्टीवर डिझेलची तस्करी करणार्‍यांवर रायगडच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने कारवाई केली आहे. या कारवाईत पोलीसांनी चारजणांना अटक केली असून 36 लाखांचे 33 हजार लीटर डिझेल व इतर साहित्य जप्त केले आहे. 17 जुलै रोजी ही कारवाई करण्यात आली आहे.

या कारवाईत गणेश काशिनाथ कोळी (वय 40 वर्षे, रा. बोडणी), विनायक नारायण कोळी (वय 45 वर्षे रा. बोडणी), गजानन आत्माराम कोळी( वय-45, रा. बोडणी), मुकेश खबरदात निषाद (उत्तर प्रदेश) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. काही दिवसापासून समुद्रमार्गे डिझेलची तस्करी होत असल्याच्या तक्रारी स्थानिक गुन्हे शाखेला मिळाल्या होत्या, त्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी गोपनीय माहिती काढून कारवाई करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांना दिले, त्यानुसार सात जणांचे एक पथक तयार करुन रेवस जेट्टीवर डिझेलची तस्करी करणार्‍यांवर लक्ष ठेवण्यास सांगितले होते.

बुधवार, 17 जुलै रोजी या पथकाला मांडवा सागरी पोलीस ठाणे हद्दीतील रेवस जेट्टी येथील समुद्रकिनारी एक बोट समुद्रमार्गे डिझेल घेवून येणार असल्याची माहीती मिळाली. त्यानुसार या ठिकाणी पाळत ठेवण्यात आली होती. संशयीत बोट किनार्‍यालगत येवून थांबताच या पथकाने बोटीजवळ जावून पाहाणी केली. पहाणीत बोटीमध्ये चौघेजण होते. त्यांचेकडे बोटीमध्ये असलेल्या मालाबाबत चौकशी केली असता त्यांनी समुद्र मार्गे अवैधरित्या डिझेल आणल्याचे सांगितले. दोन पंचांच्या समक्ष बोट व बोटीमधील 33 हजार लिटर डिझेल असा एकूण 36 लाख 40 हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. चौघांविरोधात मांडवा सागरी पोलीस भारतीय न्याय संहीता कलम 287, अत्यावश्यक वस्तु अधिनियम 1955 चे कलम 3, 7 सह पेट्रोलियम अधिनियम 1934 चे कलम 3, 23 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

SCROLL FOR NEXT