महाड : चिपळूणपासून रोह्यापर्यंत एकही सुसज्ज असे शासकीय मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल नाही. महाड येथे होऊ घातलेल्या या रुग्णालयाचे केंबुर्ली येथे काम सुरू झाले आहे. ज्यांच्या प्रयत्नाने हे रुग्णालय उभे रहात आहे. ते भाजपाचे गट नेते आमदार प्रविण दरेकर यांनी या रुग्णालयाच्या कामाची पहाणी करुन अधिकार्यांना सुचना दिल्या. तसेच या कामी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते भूमिपूजन करणार असल्याचे दरेकर या वेळी म्हणाले.
प्रविण दरेकर यांच्या प्रयत्नातून महाड येथे 200 खाटांचे सुसज्ज रुग्णालय होत आहे. केंबुर्ली येथील महामार्ग लगत जवळपास 6.5 हेक्टर मध्ये 147.7 कोटी खर्च करून हे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल होत आहे. शनिवारी आ प्रविण दरेकर यांनी या कामाची प्रत्यक्ष पहाणी केली. या प्रसंगी जिल्हा सरचिटणीस बिपीन महामुणकर, संदीप ठोंबरे, सरचिटणीस महेश शिंदे, साबाचे कार्यकारी अभियंता महेश नामदे, उप अभियंता तुकाराम सणालकर उपस्थित होते.
सदर रुग्णालय हे 200 खाटांचे आहे. या मध्ये सर्वप्रकारचे उपचार, शस्त्रक्रिया, ट्रान्सप्लांट शस्त्रक्रिया होणार आहेत. 19,830 चौरस मीटर एवढ्या भव्य स्वरुपाची पाच मजली मुख्य इमारत होणार आहे. दोन्ही बाजूने 7 मीटरचे रस्ते होणार आहेत. कालांतराने या ठिकाणी आपण वैद्यकीय महाविद्यालय सुरु करणार असल्याचा विचार दरेकर यांनी यावेळी बोलून दाखविला. रुग्णांलयासाठी व पंचक्रोशीतील गावांना उपयोगी पडेल अशी भव्य पाणीयोजना देखील आपण मंजूर करणार असल्याचे सांगितले.
या ठिकाणाचे नयनरम्य निसर्ग सौंदर्य पाहून दरेकर भाराऊन गेले. हे निसर्ग सौंदर्य पाहून रुग्णांचा अर्धा अधिक आजार बरा होईल. कामात कोणताही हलगर्जीपणा करु नका तसेच रस्त्याचे काम एक महिन्यात पूर्ण करण्याच्या सुचना देऊन कोकणातील व महाडचे भवितव्य बदणार्या या प्रकल्पाच्या भूमीपूजनासाठी आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बोलावणार असल्याचे दरेकर यांनी सांगितले.