कोप्रोली (उरण) ः आगामी जिल्हा परिषदा आणि पंचायत समिती तसेच स्थानिक स्वराज्य संस्था यासाठी रायगड जिल्हा काँग्रेसने कंबर कसली आहे. या निवडणुकांसाठी इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या. या इच्छुकांच्या गर्दीत अनुभवी नेते, विद्यमान आणि माजी जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य आणि ग्रामपंचायत सदस्य नगरसेवक, तसेच नवे चेहरे, तरुण कार्यकर्ते आणि महिलांचा देखील समावेश मोठ्या प्रमाणात होता.
यावेळी कार्यकर्त्यांनी आपली बाजू मांडली. ही निवडणूक काँग्रेसने स्वबळावर लढवावी,अशी अपेक्षा अनेक इच्छुकांनी व्यक्त केली.काँग्रेस पक्षाच्या सध्याचे राजकीय वातावरण, उदा. वाढलेली लोकप्रियता, सत्ताविरोधी लाट मुळे निवडणूक लढवण्याची इच्छा वाढली असल्याचे बोलले जात आहे. यावेळी अनेकांनी आपली मनातील इच्छा बोलताना पक्षाने संधी दिल्यास मी नक्कीच निवडून येईन आणि पक्ष कसा आणखी वाढेल तसेच सरकारी योजना सामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील असे अनेकांकडून आश्वासने देण्यात आली. एका जागेसाठी अनेक सक्षम दावेदार असल्याने, ’कोणाला संधी द्यायची आणि कोणाला डावलून त्यांची नाराजी टाळायची’ असा पेच पक्षश्रेष्ठींसमोर निर्माण झाला असल्याचे यावेळी जाणवत आहे.
ज्यावेळी स्थानिक पातळीवरील निवडणूका जाहिर होतील तेव्हा मुलाखतीला सुरूवात होणार आणि यातूनच उमेदवार निवडला जाईल अशी शक्यता वर्तवली जात आहे . यातूनच अंतिम निर्णय घेऊन काँग्रेस पक्ष लवकरात लवकर इच्छुकांच्या मुलाखती घेऊन चांगल्या असलेल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्याची शक्यता आहे.
खोपटे येथे काँग्रेस कमिटी उरण तालुका अध्यक्ष विनोद म्हात्रे यांच्या निवासस्थानाजवळ सदरची बैठक पार पडली. जिल्हा अध्यक्ष महेंद्र घरत यांच्या शेलघर येथेही बैठकीसाठी मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते जमले होते. उरण मतदारसंघांतून तब्बल जिल्हा परिषदेसाठी आणि उरण पंचायत समिती साठी 4 ते 6 हून अधिक इच्छुकांनी आपला दावा सादर केला आहे. यात अनेक विद्यमान पदाधिकाऱ्यां पेक्षा नवीन आणि तरुण चेहऱ्यांचा समावेश अधिक असल्याने, पक्षासमोर ’विजयी उमेदवार’ निवडण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे.
विजयी होण्याची क्षमता हाच निकष
पक्षाने उमेदवारांची निवड करताना विजयी होण्याची क्षमता , निष्ठा आणि स्थानिक पातळीवरील जनाधार या निकषांवर अधिक लक्ष केंद्रित करण्याचे ठरवले आहे, असे पक्षाच्या सूत्रांकडून समजले आहे कारण यावेळी सत्तेतील पक्ष मोठ्या दमाने विरोधात उभा असणार असल्याने आपला उमेदवार त्याच ताकदीचा असावा निवडून यावा यावर भर देण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे.