उरण: रायगड जिल्हा काँग्रेस अध्यक्षपदावरून महेंद्र घरत यांची तडकाफडकी हकालपट्टी करण्यात आली आहे. घरत यांच्या हकालपट्टीमुळे रायगड काँग्रेसमध्ये बंड सुरू झाल्याचे सांगितले जात आहे. सुमारे 50 हून अधिक पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिल्याची माहिती समोर येत आहे.
रायगड जिल्ह्याची उत्तर आणि दक्षिण अशी दोन भागात विभागणी केल्यानंतर रायगड काँग्रेसमध्ये नाराजीचा मोठा भडका उडाला आहे. महेंद्र घरत यांना भाजप नेते रामशेठ ठाकूर यांच्याशी असलेली जवळीक भोवल्याची चर्चा आहे.
तसेच उत्तर रायगड जिल्हा अध्यक्षपदाबाबत महेंद्र घरत यांनी सुचविलेल्या नावाचा विचार देखिल केला नाही. या निर्णयाच्या निषेधार्थ उरण तालुका काँग्रेस अध्यक्ष विनोद म्हात्रे यांच्यासह 50 हून अधिक प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आपले सामूहिक राजीनामे सुपूर्द केले आहेत.
ऑल इंडिया काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस के.सी. वेणुगोपाल यांनी रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीची पुनर्रचना केली आहे. या अंतर्गत जिल्ह्याचे दोन भाग करण्यात आले असून, उत्तर रायगड जिल्हाध्यक्षपदी जिल्हा परिषद सदस्य डॉ. मनीष पाटील तर दक्षिण रायगड जिल्हाध्यक्षपदी राजेंद्र ठाकूर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
गेल्या दीड ते दोन महिन्यांपासून काँग्रेसच्या केंद्रीय निरीक्षक रागिणी नायर यांच्या रायगड दौऱ्यानंतर जिल्ह्यातील संघटनात्मक बदलांच्या चर्चांना वेग आला होता, ज्यावर आता शिक्कामोर्तब झाले आहे.
उरण तालुका अध्यक्ष विनोद म्हात्रे यांनी दिलेल्या माहितीनुसार, संतप्त पदाधिकाऱ्यांनी थेट प्रदेशाध्यक्षांची भेट घेऊन सामूहिक राजीनामे दिले आहेत. इतकेच नव्हे तर, महेंद्र घरत यांनी स्वतः काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याचा दावा विनोद म्हात्रे यांनी केला आहे; मात्र या दाव्याला अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.
या संपूर्ण राजकीय भूकंपावर महेंद्र घरत यांची बाजू जाणून घेण्यासाठी पत्रकारांनी व पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांचा मोबाईल फोन ‘नॉट रीचेबल’ लागत होता. त्यामुळे त्यांच्या पुढील राजकीय भूमिकेकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.