रेवदंडा (रायगड) : कोकणाला लाभलेला सुमारे ७२० किलोमीटरचा अथांग समुद्रकिनारा आज कचऱ्याच्या विळख्यात सापडला आहे. मुंबईपासून रायगड-रत्नागिरीपर्यंत सर्वच किनारे प्लास्टिक, ऑईल आणि मायक्रोप्लास्टिकने प्रदूषित झालेले आहेत. मुसळधार पावसात वाहणारे नदी-नाले, बेफिकीर नागरिक व प्रशासनाचा निष्काळजीपणा यामुळे टनावारी कचरा थेट समुद्राच्या पोटात जात आहे.
कचऱ्यातील प्लास्टिकचे कण आणि ऑइल हे हजारो मासे, कासव व पक्षांच्या शरीरात अडकून त्यांचा श्वास गुदमरून ते मृत्युमुखी पडत आहेत. तसेच, माशांना मायक्रोप्लास्टिक आणि खाद्य यात फरक करता येत नाही. परिणामी सी-फूड दूषित होत असून मानवी आरोग्यालाही थेट धोका निर्माण झाला आहे.
कोकण समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांची रेल-चेल दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यामुळे स्थानिकांना रोजगाराची संधी उपलब्ध होत आहे. मात्र, पर्यटकांसह स्थानिकांकडून देखील कळत नकळत समुद्रकिनारी मोठ्या प्रमाणात कचरा फेकला जातो. स्थानिक प्रशासनाकडून देखील कचऱ्याची योग्य ती व्हिलेवाट लावली जात नाही. किंवा समुद्रकिनारी कचरा होऊ नये, यासाठी देखील उपाययोजना केली जात नाही.
काही ठिकाणी कचरा प्रशासनाच्या उपाययोजनांना केराची टोपली दाखवल्याचे निदर्शनास येत आहे. परिणामी समुद्रकिनारी साचलेला कचरा समुद्राच्या भरतीसोबत आंत जातो. त्यामुळे समुद्राचे प्रचंड प्रमाणात प्रदुषण होते. त्यामुळे समुद्रावर अवलंबून असणाऱ्या जीवांसह मानवी आरोग्य देखील धोक्यात येत
आहे. तज्ज्ञांच्या मते दरवर्षी जगभरात १०० दशलक्षाहून अधिक समुद्री जीव केवळ प्लास्टिक कचऱ्यामुळे मृत्यमुखी पडतात. तसेच, समुद्राच्या प्रदूषणामुळे माशांचे प्रमाण प्रचंड प्रमाणात घटत चालले आहे.