अलिबाग (रायगड) : मुरूडच्या कोर्लई समुद्रकिनारी संशयित पाकीस्तानी बोट प्रकरणावर पडदा पडला असला तरी यानिमित्ताने रायगडच्या सागरी सुरक्षेबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. रायगड पोलीसांच्या 9 सागरी गस्तीनौकांपैकी केवळ चारच नौका सध्या कार्यरत आहेत. त्यामुळे रायगडची सागरी सुरक्षा रामभरोसे म्हणायची का असा सवाल विचाला जावू लागला आहे.
राज्याला 720 किलोमीटर लांबीचा सागरी किनारा लाभला आहे. सागरी सीमांचे रक्षण करणे ही अत्यंत महत्वाची जबाबदारी आहे. मुंबईसह कोणात समुद्रमार्गे अनेकदा दहशतवादी कारवाया झाल्या असल्याने अलिकडच्या काही वर्षांमध्ये सागरी सुरक्षेचे महत्व वाढले आहे. सागरी सुरक्षेसाठी नौदल तटरक्षक दल जसे कार्यरत असते तशीच सुरक्षेची जबाबदारी पोलीसांवर देखील येवून पडते. सागरी सुरक्षेसाठी सागरी जिल्हयाना गस्तीनौका पुरवण्यात आल्या आहेत. या गस्तीनौकांच्या माध्यमातून सागर किनारयांवर देखरेख ठेवणे, समुद्र मार्गे होणारा परदेशी नागरीकांचा प्रवेश रोखणे, वस्तु किंवा शस्त्रांच्या तस्करीवर आळा घालणे अशी कामे केली जातात.
रायगड पोलीसांकडे एकूण 9 सागरी गस्ती नौका आहेत. त्यापैकी केवळ चार नौका कार्यरत आहेत. दोन नौकांची नोेंदणी रद्द करण्यात आली आहे. बंद करण्यात आल्या आहेत म्हणजे त्या वापरण्यायोग्य नाहीत तर आणखी एक बोटीची नोंदणी रद्द करण्याचा प्रस्ताव आहे. त्यामुळे 120 किलोमीटर लांबीच्या किनारपटटीची सुरक्षा केवळ या चार नौका करीत आहेत. महत्वाचे म्हणजे या नौका लहान आहेत. खराब हवामानात त्यांचा टिकाव लागत नसल्याने पावसाळयातील चार महिने रायगड पोलीसांची सागरी गस्त बंद असते. त्यामुळे पावसाळयातील चार महिन्यांच्या सागरी सुरक्षेचे काय असा सवाल देखील यानिमित्ताने उपस्थित होत आहे.
रायगड पोलीस दलाकडे शासकीय नौका चार असल्या तरी भाडेतत्वावर चार नौका गस्तीसाठी घेतल्या आहेत. या आठ बोटींवर मिळून 8 शस्त्रधारी पोलीस गस्त घालत असतात. मात्र सध्या पावसाळा असल्याने बोटी बंद आहेत. तसेच लँडिंग पॉईंट जेथे आहेत तेथे आम्ही चौक्या उभारत आहोत जेणे करून तेथे पोलीस बंदोबस्त राहील. हे काम येत्या आठ दिवसात होणार आहे. बोटीवर आम्हाला काही साहित्याची गरज आहे त्याचा आणि सीसीटीव्ही चा प्रस्ताव आम्ही जिल्हा नियोजन कडे पाठवणार आहोत .त्यामुळे या बोटी आम्हाला लवकर प्राप्त होतील.आंंचल दलाल, जिल्हा पोलीस अधीक्षक, रायगड
सागरी सुरक्षेच्या दृष्टीने सरकारने काही वर्षांपूर्वी एक महत्वाचे पाऊल उचलले होते. ते म्हणजे खास सागरी पोलीस ठाण्यांची निर्मिती. रायगड जिल्हयात सध्या तीन सागरी पोलीस ठाणी कार्यरत आहेत. त्यामध्ये मांडवा, दादर आणि दिघी सागरी पोलीस ठाण्याचा समावेश आहे. ही पोलीस ठाणी सागरी पोलीस ठाणी म्हणून ओळखली जात असली तरी सांगरी सुरक्षेचया दृष्टीने त्यांच्याकडे अपेक्षित साधनसामुग्री उपलब्ध असल्याचे दिसत नाही. रायगड जिल्हा हा देशाची आर्थिक राजधानी मुंबईला लागून असल्याने रायगड जिल्हयाच्या सागरी सुरक्षेला मुंबई इतकेच महत्व आहे. त्यामुळे रायगडची सागरी सुरक्षा अधिक मजबूत करणे गरजेचे आहे. त्यासाठी रायगड पोलीस दलाकडे आधुनिक सामुग्री आणि तंत्रज्ञान यांनी परीपूर्ण असलेल्या बोटींची गरज आहे. मागील काही वर्षांत रायगडच्या किनारयांवरील घडामोडी पाहता रायगड पोलीस दल सागरी सुरक्षेच्या दृष्टीने अधिक सक्षम करणे गरजेचे झाले आहे.