रोहे प्रतिनिधी : रोहा पोलिस ठाणे हद्दीत भागीरथी खार गोफण येथे एक वृध्द महिला नीलिमा नारायण वरसोलकर,( वय 65 वर्षे राहणार.रा- भागीरथीखार तालुका-रोहा ,जिल्हा रायगड ) या सुखी मच्छी विकण्याचा व्यवसाय करतात. या ठिकाणी एक नवरा बायको जोडपे दुचाकीवरुन आले त्यांनी सुकी मासळी विकत घेतली. त्यांचे लक्ष मच्छी विक्रेतीच्या गळ्यात घातलेल्या सोन्याच्या माळेवर पडली.
त्यांनी पुढे जाऊन हेल्मेट घातले व तोंडाला रुमाल बांधून विक्रेत्या वयोवृद्ध महिलेच्या गळ्यातील 3 तोळ्याची माळ जबरदस्तीने खेचून तेथून रोहा शहराकडे पळ काढला. वृद्ध महिलेने आरडाओरड केल्याने तेथील नागरिकांनी लागलीच रोहा पोलीस ठाणे येथे माहिती दिली पोलीस निरीक्षक मारुती पाटील यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून खारी चेकपोस्ट येथे पोलीस अमलदारांसह नाकाबंदी लावली.
काही वेळातच संबधित जोडपे खारी चेकपोस्ट येथे आले असता नाकाबंदी करणाऱ्या पोलिसांनी त्याना अडविण्याचा प्रयत्न केला असता वेगाने गाडी पळवून तांबडी गावाकडे पळून गेले. नाकाबंदी करणारे पो.ना.शिरसाठ, अनिल पाटील, अंगद गुट्टे, मुसळे व होमगार्ड यांनी त्यांचा दुचाकीवरून पाठलाग सुरू केला. पोलीसांनी पाठलाग सुरु केल्याचे पाहताच त्या जोडप्याने दुचाकीचा वेग वाढवला. पण पोलिसांनी त्यांना गाठले व ताब्यात घेतले आणि सोन्याची माळ आरोपींकडून हस्तगत केली. आरोपीना ताब्यात घेतले. आरोपी जोडपे हे गोरेगाव, मुंबई येथील असल्याचे सांगिण्यात आले. त्यांचेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरु केला आहे.