उरण : अलिबाग नजीक झालेल्या बोट दुर्घटनेत उरण येथील धीरज कोळी याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर, 36 वर्षांपूर्वी धीरज याच्या वडिलांचे देखील अशाच प्रकारचा मृत्यू झाला होता. जुलै 1989 ला आलेल्या वादळाध्ये धीरजच्या वडीलांचा मृत्यू झाला होता. या दोन्ही घटनांमुळे कुटुंबावर दुःखाचे सावट पसरले असून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
उरण तालुक्यातील करंजा येथील ’तुळजाई’ या मासेमारी बोटीचा अपघात होऊन तीन तरुण खलाशांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये, सोमवारी सकाळच्या सुमारास अलिबागच्या समुद्रकिनारी त्यांचे मृतदेह आढळून आले होते. यामध्ये, करंजा येथील 38 वर्षीय धीरज कोळी याचा देखील मृत्यू झाला असून तो गेल्या दोन वर्षांपासून ’तुळजाई’ या मासेमारी बोटीवर खलाशी म्हणून काम करीत होता. धीरज आणि त्याचा भाऊ सचिन हे दोघे कुटुंबाला आर्थिक सहाय्य करीत होते. मात्र 26 जुलै रोजी खांदेरी येथे तुळजाई बोट बुडाली आणि त्यात धीरज याचा दुर्दैवी मृत्यू झाला.
या दुखःद घटनेमुळे गेल्या 36 वर्षांपूर्वीच्या वादळाच्या दुर्घटनेच्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्या आहेत. यामध्ये, 23 जुलै 1989 साली रायगडच्या पश्चिम किनारपट्टीवर झालेल्या तुफान आणि वादळाच्या मोठ्या लाटांच्या प्रवाहात दुर्घटनेत मासेमारीला गेलेल्या अनेक बोटी बुडाल्या होत्या. यावेळी, बोटींवरील दोनशे पेक्षा अधिक मच्छीमारांचा मृत्यू झाला होता. यामध्ये, धीरज याचे वडील काशिनाथ कोळी यांचाही या दुर्घटनेत मृत्यू झाला होता.
यावेळी, त्यांच्या परिवारात धीरज, भाऊ, बहीण आणि आई यांचा समावेश होता. तर, या वादळात करंजा गावातील 25 पेक्षा अधिक मच्छीमारांचा मृत्यू झाल्याचे कुटुंबीयांनी सांगितले. तर, गेल्या पाच दिवसापूर्वी 26 जुलै रोजी ’तुळजाई’ बोटीच्या अपघातात धीरज याचे निधन झाल्याने त्याच्या वडिलांचा वादळात झालेल्या मृत्यूच्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. तर, धीरज याच्या मृत्यूमुळे कुटुंबाची सर्व जबाबदारी भावावर आली आहे.