अलिबाग : रमेश कांबळे
यंदाच्या मे आणि जून महिन्यात पडलेल्या तीव्र उन्हाचा मोठा फटका सुपारी बागांना बसला असून भविष्यातही अल निनोच्या प्रभावामुळे सुपारी उत्पादनाचे नुकसान होण्याची शक्यता बागायतदार वर्तवित आहेत. सध्या उन्हामुळे झाडांवरील कच्ची सुपारी मोठ्या प्रमाणावर गळून पडली असून, बागायतदारांचे अतोनात नुकसान झाले आहे. रायगड जिल्ह्यात सुमारे एक हजार हेक्टर क्षेत्र हे सुपारीचे आहे.
ऑक्टोबर हीटमुळे वर्षभर कष्ट करून हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याने सुपारी बागायतदार हवालदिल झाला असून, शासनाने तात्काळ नुकसानीचे पंचनामे करून भरपाई द्यावी, अशी मागणी अलिबाग तालुका नारळ सुपारी प्रक्रिया सहकारी संस्थेतर्फे करण्यात आली आहे.
अलिबाग तालुक्यासह कोकण किनारपट्टीत सुपारी हे येथील बागायतदारांचे प्रमुख हक्काचे नगदी पीक आहे. मात्र, यंदा मे आणि जून महिन्यात तापमानाचा पारा चाळीस अंशांच्या आसपास पोहोचला होता. या तीव्र उष्णतेमुळे आणि पाण्याच्या कमतरतेमुळे सुपारीच्या झाडांना आलेले घोस करपून गेले आणि मोठ्या प्रमाणावर फळगळ झाली. अनेक भागांत तर पन्नास ते सत्तर टक्क्यांपर्यंत सुपारीची गळ झाल्याचा अंदाज बागायतदारांनी व्यक्त केला आहे.
गेल्या काही वर्षांत कोकणाला बसलेल्या दोन चक्रीवादळांनी यातील सुपारी पिकाच्या अस्तित्वावरच घाला घातला आहे. कोकणातील विशेषत: रायगड जिल्ह्यातील सुपारी बागा या चक्रीवादळांमुळे उद्ध्वस्त झाल्या. यामुळे पिकाच्या एकूण उत्पादनावरही मोठा परिणाम झालेला दिसतो. कोकणाला दोन चक्रीवादळांचा तडाखा बसला. या आपत्तीत सर्वाधिक हानी झाली ती कोकणातील सुपारी पिकाची.
आधी निसर्ग आणि नंतर आलेल्या तौक्ते वादळाने सुपारी बागांचे मोठे नुकसान झाले. श्रीवर्धन, मुरुड आणि अलिबाग येथील ६० टक्के सुपारीच्या बागा या चक्री वादळाच्या तडाख्याने भुईसपाट झाल्या होत्या. सुपारीची लाखो झाडे वादळात उन्मळून पडली होती. याचे गंभीर परिणाम पुढे भविष्यात आता सुपारी उत्पादनावर झाल्याचे दिसून येत आहे.
दरम्यान, या वर्षी रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यात २५६ हेक्टर, मुरूड तालुक्यात ४१६ हे. रोहा १२ हे. तळा .२५ हे., म्हसळा १३ हे. आणि श्रीवर्धन तालुक्यात २७८ हेक्टर असे एकूण ९७६ हेक्टर इतके सुपारीचे क्षेत्र आहे. ते टिकवून ठेवणे व त्यातून उत्पादन घेणे दिवसेंदिवस कठीण होत आहे.
प्रशासनाने दखल घ्यावी
प्रशासनाने कृषी विभागामार्फत सुपारी बागायतदारांच्या भागात तात्काळ सर्वेक्षण करावे आणि बाधित बागायतदारांना ठोस आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी स्थानिक बागायतदारांनी केली आहे. या गंभीर परिस्थितीकडे तातडीने लक्ष देऊन बागायतदारांना दिलासा द्यावा, अशी आर्त हाक संपूर्ण परिसरातून शासनाला दिली जात आहे.
दरवर्षी सुपारीच्या पिकातून मिळणाऱ्या उत्पन्नावर शेतकऱ्यांचे वर्षभराचे आर्थिक गणित अवलंबून असते. खते, औषध फवारणी आणि पाणी देणे यासाठी बागायतदारांनी मोठा खर्च केला होता. मात्र, या निसर्गाच्या लहरीपणामुळे उत्पन्नात प्रचंड घट होणार असल्याने घातलेला खर्चही निघणे आता कठीण झाले आहे. यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा, असा यक्ष प्रश्न बागायतदारांसमोर उभा ठाकला आहे.रमेश नाईक, अध्यक्ष, सुपारी संस्था, नागाव