अंगणवाडी सेविका Pudhari News Network
रायगड

रायगड : मानधन रखडल्याने अंगणवाडी सेविकांवर उपासमारीची वेळ

मार्चचे मानधन रखडले; सेविकांना 13 हजार तर मदतनिसांना मिळते सात हजार मानधन

पुढारी वृत्तसेवा

अलिबाग : लाडकी बहीण योजनेवेळी याच अंगणवाडी कर्मचार्‍यांनी महत्वाची भूमिका पार पाडत कोटींच्या बाहेर अर्ज भरले होते. पण आता त्याच योजनेमुळे त्यांच्या मानधनावर कात्री येताना दिसत आहे. राज्यातील तब्बल दोन लाख अंगणवाडी कर्मचार्‍यांचे मार्च महिन्याचे मानधन रखडले आहे. यामुळे अंगणवाडी कर्मचार्‍यांवर उपासमारीची वेळ आली आहे.

तुटपुंजे मानधनामुळे उपासमारीची वेळ

राज्यात सुरू असणार्‍या लाडकी बहीण योजनेमुळे तिजोरीवर भार पडल्याची चर्चा सुरू आहे. यामुळे इतर योजना जिल्हा आणि विभागांच्या निधीला अजित पवार यांच्या अर्थ खात्याकडून कात्री लावली जातेय. यात आता एकात्मिक बाल विकास योजनाचा देखील समावेश झाल्याचे म्हणावे लागले. सरकारने तब्बल दोन लाख अंगणवाडी कर्मचार्‍यांचे मार्च महिन्यांचे मानधन थकवले आहे. तर आता जवळ जवळ एप्रिल महिना देखील संपत आला असल्याने दोन महिने होत आले तरीही मानधन न मिळालेल्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांवर ठिकठिकाणाहून व्याजी पैसे काढून कर्जबाजारी होऊन संसार चालविण्याची वेळ आली आहे. यामुळे आता आम्ही जगायचे कसे, असा प्रश्न अंगणवाडी कर्मचार्‍यांकडून करण्यात येत असून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली असल्याचे अंगणवाडी संघटनेच्या जिल्हा प्रमुख जीविता पाटील यांनी सांगितले. तसेच भरमसाठ पगार घेणार्‍या सरकारी कर्मचारी वर्गाचे मार्च महिन्याचे पगार मिळावे म्हणून ज्याप्रमाणे आधीच तरतूद केली जाते त्याप्रमाणे तुटपुंजे मानधन घेणार्‍या अंगणवाडी ताई आणि मदतनीस यांना मार्च एडिंगचे कारण न सांगता वेळेवर मानधन मिळावे व त्यांची होणारी उपासमारी थांबावी म्हणून योग्य ती तरतूद शासनाने आधीच का करू नये? असा प्रश्न उपस्थित करून त्यांनी शासनाविरुद्ध तीव्र नाराजी व्यक्त केली.

गेल्या आठ महिन्यांपासून मानधनच नाही

एकात्मिक बाल विकास योजनेमार्फत सुमारे दोन लाख अंगणवाडी कर्मचारी ग्रामीण आदिवासी व नागरी क्षेत्रात आपले कर्तव्य बजावत आहेत. अंगणवाडी सेविकांना दरमहा 13 हजार तर मदतनीसांना सात हजार रुपये मानधन दिले जाते. पण आता जगण्याचे एकमात्र साधन असणारी ही छोटीसी रक्कमही सरकारला देण्यास जमत नसल्याचे समोर येत आहे. या अंगणवाडी सेविकांना मिळणारे मानधन दरमहा त्यांच्या प्रपंचात खर्च होत असतो. पण आता हेच मानधन न मिळाल्यामुळे अंगणवाडी कर्मचारी व त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. तसेच काही अंगणवाडी सेविकांचे 3 ते 4 महिन्यांचे मानधन अर्धेच खात्यावर जमा झाले असून त्या देखील मानधन केव्हा होईल या प्रतिक्षेत आहेत. तर एका अंगणवाडी मदतनीस यांचे गेले 8 महिने मानधन झाले नसल्याने ती मानधनाच्या प्रतिक्षेत आहे.

अंगणवाडी सेविकांना मोबाईल रिचार्ज, टीएडीए व योजनेच्या कामासाठी स्वतःचे पैसे खर्च करावे लागतात. अशा परिस्थितीत वाढत्या महागाईचे संकट झेलत गरीब कुटुंबातील अंगणवाडी कर्मचार्‍यांना मानधन वेळेवर न मिळाल्यामुळे जगणे मुश्किल झाले आहे. अंगणवाडी कर्मचार्‍यांना दरवर्षी मार्च आणि एप्रिलच्या मानधनासाठी वाट बघावी लागते. म्हणून सरकारने त्यांच्या मानधनाचा निधी वेळेवर द्यावा, अशी अंगणवाडी कर्मचार्‍यांची मागणी आहे.

प्रोत्साहन भत्त्याची प्रतीक्षा

4 ऑक्टोबर 2024 च्या शासन निर्णयानुसार अंगणवाडी सेविकांना दोन हजार रुपये व मदतनीसांना एक हजार रुपये प्रतिमाह प्रोत्साहन भत्ता देण्याचे आदेश देण्यात आले. पण गेल्या सात महिन्यांचे अंगणवाडी सेविकांचे 13 हजार आणि मदतनीसांचे सात हजार प्रोत्साहन भत्ता व त्याची रक्कमसुद्धा अजूनपर्यंत मिळालेली नाही. तो लवकर देण्यात यावा अशी मागणी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघातर्फे महिला व बालविकास विभागकडे अनेकदा करण्यात आली आहे. तसेच या बाबात विभागांच्या मंत्री आदिती तटकरे, प्रधान सचिव व एकात्मिक बालविकास योजनेचे आयुक्त यांना पत्राद्वारे निवेदन दिलं आहे. मात्र प्रोत्साहन भत्ता व त्याची रक्कम अद्याप मिळालेली नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT