Raigad Police Rescue Operation Fourth Body Recovered Pudhari
रायगड

Ambenali Ghat Accident | आंबेनळी दुर्घटनेत बचाव पथकांचे शर्थीचे प्रयत्न; चौथा मृतदेह बाहेर, उर्वरित चौघांचा शोध सुरु

पोलादपूर महाबळेश्वर मार्गावरील आंबेनळी घाटात दाभिळ टोक जवळ स्कॉर्पिओ दरीत कोसळून ८ ठार

पुढारी वृत्तसेवा

Raigad Police Rescue Operation Fourth Body Recovered

समीर बुटाला

पोलादपूर : पोलादपूर महाबळेश्वर मार्गावरील आंबेनळी घाटात दाभिळ टोक जवळ झालेल्या भीषण दुर्घटनेनंतर सुरू असलेल्या बचाव मोहिमेत सोमवारी (दि.25) दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास आणखी एक महत्त्वपूर्ण यश मिळाले. सावित्री नदीच्या खोऱ्यातून दाभिळ गावाच्या मार्गाने दरीत उतरलेल्या बचाव पथकांनी अपघातग्रस्त स्कॉर्पिओ वाहनाजवळ पोहोचून चौथा मृतदेह बाहेर काढण्यात यश मिळविले. त्यामुळे आतापर्यंत चार मृतदेह बाहेर काढण्यात आले असून उर्वरित चार जणांचा शोध घेण्यासाठी रेस्क्यू टीमचे प्रयत्न अखंड सुरू आहेत.

दापोली हर्णे येथे पर्यटनासाठी गेलेल्या आठ युवकांची पर्यटनाची सफर परतीच्या वेळी अखेरची ठरली. हर्णे येथून शनिवारी रात्री 11 वाजता सातारा कडे मार्गस्त होत असताना रविवारी मध्यरात्री 2.45 मिनिटांनी त्याच्या गाडी ला भीषण अपघात झाला स्कार्पिओ वाहनासह सुमारे 1000 फूट खोल दरीत कोसळल्याची घटना समोर आल्यानंतर संपूर्ण सातारा जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलादपूर पोलीस, महसूल विभाग, आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा तसेच विविध स्वयंसेवी संस्थांची बचाव पथके घटनास्थळी दाखल झाली. मात्र दरीची प्रचंड खोली, निसरडे कडे, दाट जंगल आणि कठीण भौगोलिक परिस्थितीमुळे बचावकार्य अत्यंत आव्हानात्मक ठरत आहे.

प्रतापगड सर्च अँड रेस्क्यू टीम, महाबळेश्वर ट्रेकर्स, सह्याद्री ट्रेकर्स आणि इतर स्वयंसेवी संस्थांच्या सदस्यांनी जीव धोक्यात घालून दरीत उतरून शोधमोहीम हाती घेतली. सुरुवातीला वरून उतरत शोधकार्य करण्यात आले, परंतु काही मृतदेह आणि वाहन ज्या ठिकाणी अडकले होते त्या भागात पोहोचणे अत्यंत कठीण असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर बचाव पथकांनी रणनीती बदलत सावित्री नदीच्या खोऱ्यातून दाभिळ गावाच्या दिशेने दरीत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला.

महाबळेश्वर ट्रेकर्सचे बाबा भाटिया यांच्या मार्गदर्शनाखाली या पर्यायी मार्गाचा वापर करण्यात आला. अनेक तासांच्या अथक प्रयत्नांनंतर पथके दरीच्या तळाशी आणि अपघातग्रस्त वाहनापर्यंत पोहोचली. तेथून चौथा मृतदेह बाहेर काढण्यात यश मिळाल्याने उर्वरित चार जणांचा शोध घेण्याच्या मोहिमेला नवी दिशा मिळाली आहे.

सावित्री नदीकाठचा परिसर अत्यंत दुर्गम असल्याने बचाव पथकांना प्रत्येक टप्प्यावर मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. खडकाळ भूभाग, दाट झाडी आणि धोकादायक उतार यामुळे शोधकार्य सावधगिरीने करावे लागत आहे. तरीही दोरखंड, स्ट्रेचर आणि इतर तांत्रिक साधनांच्या सहाय्याने पथके सातत्याने शोधमोहीम राबवत आहेत.

घटनेची गंभीरता लक्षात घेऊन उपविभागीय पोलीस अधिकारी शंकर काळे, तहसीलदार कपिल घोरपडे तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंद रावडे हे घटनास्थळी उपस्थित राहून संपूर्ण मोहिमेवर लक्ष ठेवून आहेत. विविध विभागांमध्ये समन्वय साधून बचावकार्य अधिक वेगाने आणि सुरक्षितपणे पार पाडण्यासाठी प्रशासनाकडून आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहेत.

दरम्यान, अपघातग्रस्त वाहनातील रितेश राजेंद्र लोखंडे, सुहास जितेंद्र लोखंडे, महेश अनिल पवार, आदित्य अशोक साळुंखे, करण आनंद शिंगटे, निखिल अभिमन्यू शिंगटे, संदीप अशोक काटकर आणि अंश समीर चव्हाण हे युवक असल्याची माहिती समोर आली आहे. अधिकृत ओळख व पंचनामा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रशासनाकडून पुढील माहिती जाहीर केली जाणार आहे.

आंबेनळी घाटातील या दुर्दैवी दुर्घटनेने संपूर्ण सातारा जिल्हा शोकमग्न झाला असून उर्वरित चार जणांचा शोध घेण्यासाठी सुरू असलेल्या या कठीण मोहिमेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. चौथा मृतदेह बाहेर काढण्यात यश आल्यानंतर बचाव पथकांचा आत्मविश्वास वाढला असून उर्वरित युवकांपर्यंत पोहोचण्यासाठी रेस्क्यू टीम दिवस-रात्र प्रयत्न करत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT