Alibaug Tribal Families Housing Pudhari
रायगड

Raigad News | सात गुंठे जागा देत आदिवासी कुटुंबांना बांधून दिली पक्की घरे; पाणी, वीज आणि मूलभूत सुविधाही उपलब्ध

आदिवासी कुटुंबांमध्ये गैरसमज पसरवून आपापसांत वाद निर्माण करण्याचा प्रयत्न

पुढारी वृत्तसेवा

Alibaug Tribal Families Housing

अलिबाग : जुन्या घरांच्या जागेचा प्रश्न निर्माण झाल्यानंतर आदिवासी कुटुंबांना हक्काचा निवारा मिळावा, यासाठी दशरथ पाटील यांनी पुढाकार घेत सात गुंठे जागा उपलब्ध करून देत तेथे पक्की घरे बांधून दिली. तसेच पिण्याचे पाणी, वीज, सभामंडप आणि इतर मूलभूत सुविधांचीही व्यवस्था केली. मात्र, आता या प्रकरणावरून आदिवासी कुटुंबांमध्ये गैरसमज पसरवून आपापसांत वाद निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप संबंधित आदिवासी कुटुंबांनी केला आहे.

याबाबत आपली भूमिका स्पष्ट करताना संबंधित आदिवासी कुटुंबांनी सांगितले की, पूर्वी आम्ही कुडाच्या घरांमध्ये राहत होतो. जुन्या घरांच्या जागेचा प्रश्न निर्माण झाला असताना दशरथ पाटील यांनी आम्हाला दुसऱ्या ठिकाणी जागा उपलब्ध करून देऊन घरे बांधून देण्याची तयारी दर्शवली. आमची परिस्थिती आणि घरांची गरज लक्षात घेऊन त्यांनी दिलेला प्रस्ताव आम्ही सकारात्मकपणे स्वीकारला. त्यानंतर त्यांनी आमच्यासाठी सात गुंठे जागा उपलब्ध करून दिली आणि त्या जागेवर पक्की घरे बांधून दिली.

घरांची व्यवस्था करण्याबरोबरच आदिवासी कुटुंबांना पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी बोअरवेलची सुविधाही करून देण्यात आली. मात्र, पहिल्या बोअरवेलचे पाणी खराब लागत असल्याने आता दुसरी नवीन बोअरवेल मारण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. याशिवाय सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी सभामंडपाची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच मंदिर बांधून देण्याचे आश्वासनही देण्यात आल्याचे कुटुंबीयांनी सांगितले.

विशेष म्हणजे, केवळ घरांची उभारणी करून हा विषय थांबविण्यात आलेला नाही, तर प्रत्येक आदिवासी कुटुंबाच्या नावावर घरांची नोंदणी करण्यात आली आहे. घरपट्टी, असेसमेंट उतारे आणि इतर आवश्यक कागदपत्रेही संबंधित कुटुंबांना देण्यात आली आहेत. घरांसाठी वीजपुरवठा तसेच इतर आवश्यक मूलभूत सुविधांची पूर्तता करण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

गैरसमज पसरवून कुटुंबांमध्ये वाद निर्माण केल्याचा आरोप

दरम्यान, या प्रकरणात उल्का महाजन या आदिवासी कुटुंबांमध्ये गैरसमज निर्माण करून त्यांना भडकवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप संबंधित कुटुंबांनी केला आहे. यामुळे एकाच समाजातील कुटुंबांमध्ये मतभेद निर्माण होत असून, भावाभावांमध्येही वादाचे प्रसंग उद्भवत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.

आम्हाला राहण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्यापासून पक्की घरे बांधून देणे, घरांची नोंदणी करणे आणि आवश्यक कागदपत्रे देण्यापर्यंत अनेक कामे करण्यात आली आहेत. पाणी, वीज आणि इतर सुविधाही उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. असे असताना विनाकारण गैरसमज पसरवून आदिवासी कुटुंबांमध्ये वाद निर्माण करणे योग्य नाही. आम्हाला शांततेत आणि एकोप्याने राहायचे आहे. आता या प्रकरणाच्या नावाखाली बाहेरील कोणालाही आमच्या कुटुंबांमध्ये हस्तक्षेप करू देणार नाही, अशी ठाम भूमिका संबंधित आदिवासी कुटुंबांनी व्यक्त केली.

प्रशासकीय स्तरावर प्रकरण निकाली

या प्रकरणी अलिबाग तहसीलदार तसेच संबंधित मंडळ अधिकारी (सर्कल) यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून माहिती घेतली असता, संबंधित प्रकरणाची सुनावणी आणि आवश्यक प्रशासकीय कार्यवाही पूर्ण झाली असून, ही केस निकाली काढण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे प्रशासकीय स्तरावर या प्रकरणाचा निपटारा झाल्याची माहिती समोर आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT