Alibaug Shahapur Shravan Ashtami
जयंत धुळप
रायगड : कोकण प्रांत हा आपल्या प्राचीन आणि आगळ्यावेगळ्या परंपरांसाठी प्रसिद्ध आहे. या परंपरा पिढ्यान्पिढ्या जपल्या जातात. अशाच अनोख्या आणि अचंबित करणाऱ्या परंपरांपैकी एक परंपरा रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील खारेपाट विभागातील शहापूर गावात जिवंत आहे. येथे श्रावण अष्टमीच्या रात्री, कानिफनाथ म्हणजेच श्रीकृष्ण जन्माच्या वेळी, श्रीकृष्णाला अरेबिक भाषेत गाऱ्हाणे घालण्याची परंपरा आहे. ही प्रथा सुमारे १०० वर्षांपूर्वीची असून सध्या भगत घराण्याच्या चौथ्या पिढीने ती अबाधित राखली आहे, अशी माहिती राजन भगत यांनी दिली.
शहापूरमध्ये श्रीकृष्णाची एकूण चार स्थाने आहेत — भगत आणि थळे घराण्यात प्रत्येकी एक, तर पाटील घराण्यात दोन. स्थानिक आगरी बोलीत यांना ‘अस्तान’ म्हटले जाते. जन्माष्टमीच्या रात्री भगत कुटुंबातील सदस्य नैवेद्यासाठी खास ताट घेऊन अस्तानात जातात. ताटात तांदूळ भाजून जात्यात दळलेला, पोहे, गूळ, नारळ, फळे, केवड्याचे पान आणि त्यासोबत नावाची चिठ्ठी ठेवली जाते.
रात्री १० वाजता पहिली कानिफनाथ स्वारी अंगात येते, तर १२ वाजता पारंपरिक पाळणा गात कृष्णजन्म साजरा केला जातो. नंतर पुन्हा १२.३० वाजता कानिफनाथ स्वारीदरम्यान भगत घराण्यातील ज्येष्ठ कृष्णा रघुनाथ भगत यांच्या अंगात वारे संचारतात आणि ते श्रीकृष्णाला सर्वांच्या सुखशांतीसाठी अरेबिक भाषेत गाऱ्हाणे घालतात. हे ऐकताना नव्याने आलेले लोक अचंबित होतात.
राजन भगत यांच्या मते, १०० ते १५० वर्षांपूर्वी परकीय सत्ताकाळात येथे वास्तव्य करणारे अरेबिक लोक कानिफनाथांना त्यांच्या भाषेत गाऱ्हाणे घालत. ती परंपरा पुढे हिंदू समाजातही रूढ झाली. गंमत म्हणजे, कानिफनाथ स्वारीदरम्यान गाऱ्हाणे घालणाऱ्या कृष्णा भगत यांना नंतर त्या भाषेचा किंवा मजकुराचा काहीच आठवत नाही. गेली ६० वर्षे ते हा मंत्रोच्चार करत आहेत.
अखेरीस सर्व घरी आणलेल्या नैवेद्याचा प्रसाद एकत्र करून ‘मलिंदा’ तयार केला जातो आणि तो गावातील सर्वांना वाटला जातो. याच ताटांतून तो प्रसाद घरीही नेला जातो.