अलिबाग : रमेश कांबळे
रायगड जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या अलिबाग नगरपरिषद हद्दीत असणार्या 88 शासकीय कार्यालयांचा तब्बल 49 लाख 13 हजार 551 रुपयांची मालमत्ता कर थकीत असून त्याच्या वसुली करिता अलिबाग नगरपरिषदेची मोठी दमछाक होत आहे. या 88 शासकीय कार्यालयांत रायगड जिल्हा परिषदेची सर्वाधिक 23 लाख 91 हजार 181 रुपये मालमत्ता कर थकबाकी आहे. सरकारी इमारतींच्या या कर थकबाकीमुळे अलिबागच्या विकास कामावर त्याचा विपरीत परिणाम होत असल्याचे समोर आले आहे.
अलिबाग नगर परिषद हद्दीत असणार्या रायगड जिल्हा परिषद कार्यालयापासून थेट अप्पर जिल्हाधिकारी निवासस्थान पर्यंत सर्व शासकीय कार्यालये निवास स्थान तसेच काही इतर नावाजलेल्या संस्थेचे देखील मालमत्ता कर थकीत आहे. अलिबाग नगर परिषदेने कर वसुली साठी पाच वसुली पथके नेमण्यात आले असून प्रत्येक पथकामध्ये तीन ते पाच जणांची निवड करण्यात आली आहे.
वसुली पथकातील कर्मचार्यांनी घरोघरी भेटी देऊन नागरिकांकडून कर वसुलीच्या मोहीमेला सुरुवात केली आहे. करवसुली मोहिमेला जनसामान्य नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून नागरिकांकडून नगरपरिषदेच्या थकीत करांचा भरणा करण्यात येत आहे. मात्र त्याच वेळी सरकारी मालमत्ताची कर वसूली कशी करायची असा प्रश्न या पथकांसमोर आहे.
जिल्ह्यातील सर्व नगरपरिषदांनी कर वसूलीसाठी विशेष पथकांची नियुक्ती केली असून दैनंदिन करवसूलीचा आढावा मुख्याधिकारी यांचेकडून घेण्यात येत आहे. नियुक्त विशेष पथके शहरातील विविध भागांत करदात्यांच्या भेटी घेऊन करवसुली मध्ये महत्त्वाचे योगदान देत आहेत, अशी माहिती अलिबाग नगर परिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी सचिन बच्छाव यांनी दिली. मुदतीत व परिपूर्ण कर वसूली मुळे नागरिकांना नागरी सुविधा प्रदान करणे, स्वच्छता राखणे, नगरपरिषदेद्वारे संचलित होणारे दैनंदिन कामे करणे सुकर होते. यामुळे नगरपरिषदेस नवनवीन योजना संकल्पना राबविण्यास मदत होते.परिणामी मालमत्ता कर भरणा करुन सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी नागरिकांना केले आहे.
शहराचा विकास व सर्व प्रकारच्या नागरी सुविधा पुरविण्यासाठी करवसुली शंभर टक्के होणे महत्वाचे आहे. त्यामुळे नागरिकांनी स्वतःहून कराचा भरणा केल्यास शहराचा विकास होण्यास वेळ लागणार नाही. नागरिक ही बाब गांभीर्याने घेतील अशी अपेक्षा आहे.सचिन बच्छाव, प्रशासक तथा मुख्याधिकारी, अलिबाग नगरपरिषद, रायगड
नगर परिषदेच्या हक्काचे उत्पन्न असलेल्या घरपट्टी मालमत्ता कराचे उद्दिष्ट 12 कोटी रुपये असून 23 मार्च 2025 पर्यंत 5 कोटी 80 लाख 46 हजार 459 म्हणजे आतापर्यंत फक्त 48.372 टक्के कर वसूल झाला आहे. मार्च अखेरच्या पार्श्वभूमीवर वसुलीचे उद्दिष्ट गाठणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे विविध कर विभागाने थकबाकीदारांना नोटिसा बजावल्या आहेत. अलिबाग नगर परिषदेने कर वसुली साठी पाच वसुली पथके नेमण्यात आले आहेत.