MSEDCL Electricity Theft Raid
पनवेल : अनधिकृत इमारतींमध्ये होणारी वीजचोरी आणि वीजवापरातील गैरप्रकारांविरोधात महावितरणने ऐरोली परिसरात धडक मोहीम राबविली. एकाच दिवसात केलेल्या तपासणीत १०५ ठिकाणी वीजचोरी अथवा वीजवापरातील अनियमितता आढळून आली. यापैकी ७८ ठिकाणी विद्युत अधिनियम २००३ मधील कलम १३५ अंतर्गत तब्बल १ लाख ४३ हजार ६३ युनिटची, ३१ लाख ३१ हजार रुपयांची वीजचोरी उघडकीस आली.
महावितरणच्या भांडूप नागरी परिमंडलात राबविण्यात आलेल्या या मोहिमेत ऐरोली गाव, साईनाथवाडी, देशमुखवाडी, गोठवली आणि घणसोली परिसरातील अनधिकृत इमारतींमधील वीजजोडण्यांची तपासणी करण्यात आली. मुख्य अभियंता संजय पाटील आणि वाशीचे अधीक्षक अभियंता दीपक पाटील यांच्या नेतृत्वाखाली सात विशेष पथकांनी ही कारवाई केली. पाच कार्यकारी अभियंत्यांसह ५५ हून अधिक अधिकारी-कर्मचाऱ्यांनी मोहिमेत सहभाग घेतला.
तपासणीदरम्यान २२ संशयित वीजचोरीची प्रकरणेही आढळून आली असून, त्यांच्यावर देखरेख ठेवण्यात आली आहे. याशिवाय कलम १२६ अंतर्गत तीन आणि साध्या मूल्यांकनाची दोन प्रकरणे समोर आली.
स्मशानभूमी गार्डन परिसरातील दोन ग्राहकांकडून ३९ हजार ६२९ युनिटची ९.६३ लाख रुपयांची वीजचोरी सर्वाधिक आढळली. माऊली अपार्टमेंटमधील १८ ग्राहकांकडून ५.३३ लाख, पनशील अपार्टमेंटमधील तीन ग्राहकांकडून ३.१८ लाख आणि मातोश्री अपार्टमेंटमधील ११ ग्राहकांकडून २.५४ लाख रुपयांची वीजचोरी उघडकीस आली.
वीजचोरीमुळे नियमित ग्राहकांवर आर्थिक भार पडत असल्याने अशा गैरप्रकारांविरोधातील कारवाई यापुढेही सुरूच राहणार असल्याचा इशारा महावितरणने दिला आहे. अनधिकृत जोडणी, मीटरमध्ये फेरफार किंवा वीजचोरी करणाऱ्यांवर विद्युत अधिनियमांतर्गत कठोर कारवाई करण्यात येणार आहे.