माथेरान : मिलिंद कदम
आपल्याला सुध्दा लवकरच ई-रिक्षा मिळेल आणि आपली या हातरिक्षांच्या अमानवीय प्रथेतून कायमस्वरूपी मुक्ती मिळेल याच एकमेव आशेवर इथला कष्टकरी, श्रमिक हातरीक्षा चालक येणार्या प्रत्येक दिवसांवर आपले स्वप्न लवकरच साकार होईल या आशेच्या किरणावर जगताना दिसत आहे.
अनेक वर्षांच्या पाठपुराव्याने कधी नव्हे असा बदल या दुर्गम पर्यटनस्थळावर पर्यावरण पूरक ई रिक्षाच्या माध्यमातून पहावयास मिळत आहे. हा जो काही आमूलाग्र बदल घडला आहे त्यासाठी हातरीक्षा संघटनेचे सचिव प्राध्यापक सुनील शिंदे यांना अनेक अग्निदिव्य पार करावी लागली आहेत. जरी या गावात अत्यावश्यक, सकारात्मक विकास कामांसाठी नेहमीप्रमाणे काही मोजकेच विरोधक जरी असले तरी त्यांना पाठबळ देणारी काही कुटील राजकारणी मंडळी हे आजही पाठीराख्याची भूमिका मूठभर मतांसाठी बजावताना दिसत आहेत. त्यामुळेच या ठिकाणी आजमितीपर्यंत विविध विकास कामाची गंगा येण्यास विलंब होत आहे.
मुळात सनियंत्रण समितीमध्ये स्थानिक कुणी सदस्य नसून मुंबईतील धनाढय मंडळी कार्यरत आहेत की ज्यांना या गावाविषयी काही सहानुभूती नाही. इथला सर्वसामान्य हात रिक्षा चालक कसे जीवन जगतोय याबाबत काही एक स्वारस्य दिसत नाही.आमच्या संघटनेने ई रिक्षासाठी एवढा पाठपुरावा केला असून शासनाच्या धोरणानुसार सकारात्मक प्रतिसाद या समितीने द्यायलाच हवा.जहुर चिपाडे, हातरीक्षा चालक
जवळपास 94 हातरीक्षा चालकांपैकी केवळ वीस जणांना ई रिक्षा देण्यात आल्या आहेत. या संख्येत टप्प्याटप्प्याने वाढ होईल अशी अपेक्षा हातरीक्षा चालकांना वाटत होती. परंतु पायलट प्रोजेक्ट पूर्ण होऊन सुध्दा ई रिक्षाच्या संख्येत वाढ झालेली नाही त्यामुळे कष्टकरी श्रमिक हवालदिल झाले आहेत. वीस ई रिक्षा सुरू झाल्यापासून स्वस्त आणि सुरक्षित प्रवास देणारी ई रिक्षाची सुविधा उपलब्ध झाल्यामुळे हातरीक्षांचा वापर सहसा कुणी पर्यटक करताना दिसत नाहीत. त्यामुळे उर्वरीत 74 हातरीक्षा चालकांवर उपासमारीची वेळ आली आहे. सुप्रीम कोर्टाने ई रिक्षा बाबतीत सर्व अधिकार सनियंत्रण समितीकडे सुपूर्द केल्यामुळे ही समिती निर्णय घेईल त्यावर अवलंबून आहे परंतु 5 डिसेंबर ते 4 मार्च 2023 असे एकूण 3 महिने, त्यानंतर डिसेंबर 2024 ते फेब्रुवारी 2025 पर्यंत 15 महिने असा एकूण 18 महिन्यांचा पायलट प्रोजेक्ट पूर्ण होऊन सुध्दा या अकार्यक्षम समितीकडून काहीही हालचाली दिसत नाहीत.
वाढत्या वयानुसार हातरीक्षांचे अतिकष्टदायक काम करणे माझ्यासह अन्य सहकार्यांना सुध्दा जमत नाही. केवळ नाईलाजाने कुटुंबातील सदस्यांना आधार पोटाची भूक भागविण्यासाठी हातरीक्षा ओढण्याचा व्यवसाय करावा लागत आहे. अजून कुठपर्यंत हा कठीण प्रवास आम्हाला करावा लागणार आहे हे देवालाच माहीत.किसन वाघेला, हातरीक्षा चालक
स्वतंत्र भारत देशात आपला हक्क मिळविण्यासाठी आजही या दुर्गम भागातील कष्टकरी लोकांना संघर्ष करावा लागतो आहे ही लाजिरवाणी बाब आहे. इथले चित्र स्पष्ट दिसत असताना खोडसाळ वृत्तीने सनियंत्रण समितीचे पदाधिकारी वागत असून गरिबांचा कैवारी कुणी आहे की नाही हा प्रश्न आम्हाला पडला आहे.संतोष लखन, हातरीक्षा चालक