Raigad Seafood Demand Pudhari
रायगड

Raigad Seafood Demand: तळा तालुक्यातील चविष्ट सोड्यांना खवय्यांची पसंती

मागणीनुसार पुरवठा,स्थानिकांना रोजगाराची संधी

पुढारी वृत्तसेवा

संध्या पिंगळे

तळा: तळा तालुक्यातील मांदाड काठालगत रहाटाड, वाशीह वेली, मांदाड, मजगांव, कुडे, गिरणे, रोवळा इत्यादी गावे आहेत. या खाडीकाठच्या रहाटाड या गावचे सोडे प्रसिद्ध आहेत. कोणीही विश्वासाने खरेदी करावे असे असतात.

त्या सोड्यांमध्ये कोणतीही फसवणूक होत नाही. त्यामुळे या सोड्यांना मुंबई, पुणे ते रायगड जिल्ह्यातील सर्व भागांतून खवय्यांची पसंती आहे. दरवर्षी मागणीत वाढ होत आहे. मात्र रहाटाड गावच्या 25 ते 30 इंजिनवरील होड्या होत्या, त्या आता दोन, तीन राहिल्याने मच्छीमारीत घट झाली आहे. त्याचा परिणाम पूर्वी पेक्षा आता सोड्यांच्या उत्पादनात घट झाल्याचे पहावयास मिळत आहे.

रहाटाड येथील कोळी बांधव या सोड्यांसाठी मोठ्या जिकरीने खाडीत उतरून आपल्या होड्या घेऊन समुद्रात खोल पर्यंत जातात. दिघी बंदराच्या परिसरापासून सहा ते सात वाव आत समुद्रात मच्छीमारी करतात. अंदाजाने या भागात चांगल्या प्रकारची व रूचकर चवीला असणारी मोठी कोळंबी मिळत असते.

उधानाच्या भरतीवर जसजसा उन्हाळा येत जातो व पावसाळ्याची चाहूल मच्छीला जाणवते तेव्हा अधिक प्रमाणात कोलंबीची मासेमारी होते. ही आणलेली कोळंबी पूर्वीपासून रहाटाड येथील कातळावर व सिमेंटच्या ओट्यावर मोठ्या मेहनतीने सुकविली जाते.

आता मात्र या ओट्यांवरती कमीप्रमाणात सोडे सुकविले जात असून आता येथील कोळी बांधव खोल समुद्रा पर्यंत काही दिवस मच्छीमारी साठी जातात. तेथे चांगली कोळंबी मिळते. ती सुकवून त्यांचे सोडे सुकवून चांगले चवीष्ट आणत असतात.

पूर्वी हे रहाटाडचे कोळी बांधव हातवल्ह्याच्या साहाय्याने साध्या होड्या घेऊन रहाटाड बंदर ते आगरदांडा असा प्रवास 3 तासात पार करायचे कालांतराने बंदरात यांत्रिकी होड्या आल्या तेच अंतर आता पाऊण ते एक तासात पार करू लागले. त्यामुळे वेळेची बचत होऊन ताजी मासळी लोकांपर्यंत पोहचू लागली.

अशा या कोळीवाड्यात मच्छीमार सोसायटी असणे गरजेचे आहे. पूर्वी या कोळीवाड्यात विजय मच्छीमार सोसायटी कार्यरत होती. आता मात्र ही बंद अवस्थेत आहे. तरी सुध्दा हे कोळी बांधव आपला पारंपारिक व्यवसाय जपत असून खवय्यांना ओरिजनल सोडे देत आहेत.

ही जर मच्छीमार सोसायटी अथवा नवीन मच्छीमार सोसायटी सुरू झाली तर येथील कोळी बांधवांना होड्या, डिझेल, जाळे इत्यादी साहित्य या द्वारे पुरवठा होऊन सध्या ठराविक होड्यांतून मच्छीमारी होते ती अधिक होड्या वाढून मच्छीमारी अधिक होईल व रहाटाड हे ओरिजल सोड्यांसाठी अधिक प्रसिद्ध होईल. असे कोळी बांधव बोलत आहेत.

महागाईने दरातही वाढ

मागील वर्षी 1500 ते 1800 रूपये प्रमाणे सोडे विकले जात होते. यावर्षी 1500 ते 2500 रू.किलो दरम्यान भाव आहे. त्यातही वाढ होण्याची शक्यता आहे. सध्या महागाई वाढत असल्याने सोड्यांचाही भाव वाढवावा लागत आहे. मच्छिमारी करताना होणारा त्रास व खर्च यादृष्टीने सोड्यांचा भाव हा कमी आहे. तसेच आता हवे तसे उत्पादन मिळत नसल्याने व अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याने कोळी बांधवांचा नोकरीसाठी मुंबई पुणेकडे जाण्याचा कल अधिक वाढल्याने ठराविक कोळी बांधव मच्छीमारी करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT