Raigad Environment pudhari photo
रायगड

Raigad Environment : कांदळवनांवरील अतिक्रमणांविरोधात वनविभागाची कारवाई

अलिबाग कोळीवाडा परिसरातील अनेकांचे धाबे दणाणले; कुरुळ येथेही कारवाई होणार?

पुढारी वृत्तसेवा

अलिबाग : रमेश कांबळे

अलिबाग कोळीवाडा परिसरातील कांदळवन क्षेत्रावर करण्यात आलेल्या अतिक्रमणाविरोधात वनविभागाच्या कांदळवन अतिक्रमण विरोधी पथकाने २७ मे २०२६ रोजी कारवाई केली. मात्र याच परिसरात दहा ते बारा ठिकाणी अतिक्रमणे झाल्याचे स्थानिकांकडून सांगितले जात असताना केवळ एका व्यक्तीवरच कारवाई करण्यात आल्याने वनविभागाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. कायदा सर्वांसाठी समान असताना एका व्यक्तीवर कारवाई आणि इतरांकडे दुर्लक्ष का करण्यात आले, याची चर्चा आता अलिबाग परिसरात रंगू लागली आहे.

२००५ नंतर उच्च न्यायालयाने कांदळवन संरक्षणाबाबत दिलेल्या आदेशांनुसार कांदळवन क्षेत्राची तोडफोड करून भराव टाकून अतिक्रमण करण्यात आले असल्यास ते तात्काळ निष्कासित करण्याचे स्पष्ट निर्देश आहेत. अशा परिस्थितीत अलिबाग कोळीवाडा परिसरात अनेक ठिकाणी अतिक्रमणे अस्तित्वात असल्याचा दावा होत असताना कारवाईचा बडगा फक्त एका व्यक्तीवरच का उगारण्यात आला, हा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

दरम्यान, कारवाई झालेल्या प्रकाश भगत यांनी वनविभागाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. भगत यांनी सांगितले की, २७ मे २०२६ रोजी कांदळवन अतिक्रमण विरोधी पथकाने त्यांच्या जागेवर कारवाई केली. "आम्ही चुकीचे असू तर आमच्यावर कारवाई व्हायलाच हवी; मात्र याच परिसरात इतर अनेक ठिकाणी अतिक्रमणे झालेली असताना त्यांच्यावर कारवाई का झाली नाही?" असा सवाल त्यांनी उपस्थित केला. याबाबत त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सातत्याने विचारणा केली होती.

"परिसरात असलेल्या इतर अतिक्रमणांवर तुम्ही कारवाई का करत नाही?" असा प्रश्न विचारला असता, "तुमच्या विरोधात तक्रार आली आहे, त्यामुळे आम्ही कारवाई करत आहोत," असे उत्तर अधिकाऱ्यांकडून देण्यात आल्याचा दावा भगत यांनी केला.

भगत यांच्या या दाव्यामुळे वनविभागाच्या कारवाईतील कथित विसंगती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. जर अतिक्रमण हेच कारवाईचे निकष असतील, तर तक्रार आली म्हणून एका व्यक्तीवर कारवाई आणि इतर अतिक्रमणांकडे दुर्लक्ष का करण्यात आले, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

या संदर्भात अलिबागचे वनपरिक्षेत्र अधिकारी कुलदीप पाटकर यांनी माहिती देताना सांगितले की, अलिबाग कोळीवाडा तसेच कुरूळ परिसरात अतिक्रमण झाल्याचे निदर्शनास आले असून संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच संबंधित उर्वरित अतिक्रमणे लवकरच निष्कासित करण्यात येणार आहेत. अतिक्रमण सुरू असताना किंवा झाल्यानंतरही विभागातील कर्मचाऱ्यांनी दुर्लक्ष केले असल्याचे आढळल्यास त्यांच्याविरोधात चौकशी करून कठोर कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशाराही त्यांनी दिला.

पाटकर यांच्या या वक्तव्यामुळे वनविभागातील काही कर्मचाऱ्यांच्या भूमिकेवरच संशयाची सुई फिरू लागली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निदर्शनास हा प्रकार आल्यानंतर संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाईची शक्यता निर्माण झाली असून अनेकांचे धाबे दणाणल्याची चर्चा सुरू आहे. निवडक कारवाईच्या आरोपांची चौकशी झाल्यास अनेक बाबी समोर येण्याची शक्यता आहे.

त्यामुळे अलिबाग कोळीवाडा परिसरात झालेल्या कारवाईपेक्षा कारवाईच्या पद्धतीवरच अधिक प्रश्न उपस्थित होत आहेत. जर एका अतिक्रमणधारकाविरोधात कारवाई होऊ शकते, तर त्याच परिसरातील इतर अतिक्रमणधारकांवरही त्याच निकषांनुसार कारवाई व्हायला हवी होती. अन्यथा वनविभागातील काही कर्मचाऱ्यांनी विशिष्ट व्यक्तींना अभय दिले होते का, असा संशय अधिक बळावत आहे.

वनविभागाने यापुढे अतिक्रमण हटवून त्या जागेवर पुन्हा कांदळवनांची लागवड करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. ज्या ठिकाणी भराव टाकून अथवा कांदळवन नष्ट करून जागा बळकावण्यात आली आहे, त्या ठिकाणी पुन्हा कांदळवन संवर्धन आणि संरक्षणाची मोहीम राबविण्यात येणार असल्याचे पाटकर यांनी स्पष्ट केले. तसेच नागरिकांनी कांदळवन क्षेत्रातील अतिक्रमणाबाबत कोणतीही माहिती असल्यास ती तात्काळ वनविभागाला कळवावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

  • वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संबंधित कर्मचाऱ्यांवर चौकशी आणि कारवाईचे संकेत दिल्यामुळे वनविभागाची अतिक्रमणविरोधी मोहीम आणखी तीव्र होण्याची चिन्हे आहेत. अलिबाग, कुरूळसह अन्य कांदळवन क्षेत्रांतील अतिक्रमणांवरही लवकरच मोठी कारवाई होण्याची शक्यता व्यक्त होत असून अतिक्रमणधारकांसह दुर्लक्ष करणाऱ्या कर्मचाऱ्यांचेही धाबे दणाणले आहेत. वनविभाग आता खरोखरच सर्वांवर समान न्यायाची भूमिका घेतो की निवडक कारवाईची परंपरा कायम ठेवतो, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT