Mumbai Goa highway toll protest Pudahri
रायगड

Mumbai Goa highway toll protest: मुंबई-गोवा महामार्गावर अखेर टोल सुरु; शिवसेना ठाकरे गटाच्या आंदोलनाला यश

खारपाडा टोलनाक्यावर ठाकरे सेनेमुळे स्थानिक वाहनांना मिळणार टोलमुक्ती

पुढारी वृत्तसेवा

पेण: मुंबई-गोवा महामार्गाचे काम गेल्या अनेक वर्षापासून सुरू असून अजूनही अनेक ठिकाणी काम अर्धवट असताना राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने पेण तालुक्यातील खारपाडा येथील टोल नाका आजपासून (15 मे) सुरू केल्याने स्थानिकांना टोल माफी मिळावी याकरिता शिवसेना ठाकरे गटाचे रायगड जिल्हा संपर्कप्रमुख प्रसाद भोईर, जिल्हाप्रमुख सुरेंद्र म्हात्रे आणि पेण तालुका प्रमुख समीर म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.

जवळपास तीन ते चार तास चाललेल्या या आंदोलनानंतर संबंधित प्रशासन अधिकारी, टोल कंपनीचे व्यवस्थापक तसेच पनवेल पोलीस अधिकारी यांच्या मध्यस्थीनंतर जिल्ह्यातील एम एच शुन्य सहा नोंदणीकृत असलेल्या स्थानिक वाहनांना टोल मुक्ती देण्यात येणार असल्याचा तसेच येथील स्थानिक तरुणांना टोलनाक्यावर नोकरीत सामावून घ्यायचा निर्णय होताच सदर आंदोलन स्थगित करण्यात आले.

कोकणातील एकमेव असणाऱ्या मुंबई-गोवा महामार्गावरील अनेक ठिकाणीची कामे अपूर्ण अवस्थेत असून येथील साईट पट्ट्या उड्डाणपूल, अंडरपास, ड्रेनेज व्यवस्था आणि इतरही मूलभूत सुविधा पूर्ण झालेल्या नाहीत. तसेच ग्रामीण भागाला जोडणारे अंतर्गत रस्ते, रस्त्याच्या कडेला धुळीचे साम्राज्य यासह महामार्गावर लावण्यात आलेल्या हिंदी भाषिक फलक या सर्व गोष्टींमुळे अनेकदा येथे अपघात घडत असून यामध्ये नागरिकांचे नाहक जीव गेले आहेत.

त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने या सर्व गोष्टी तात्काळ सोडविणे गरजेचे असतानाही त्यांनी सर्वप्रथम टोल सुरू करण्यावर दिलेला भर पाहता हा स्थानिकांवर असलेला अन्याय लक्षात घेता जनतेच्या हिताकरिता शिवसेना ठाकरे गट नेहमीच अग्रेसर राहिला असून सुरू होत असलेल्या खारपाडा टोल नाक्यावरून रायगड जिल्ह्यातील एम.एच.शुन्य सहा या नोंदणीकृत वाहनांना टोलमुक्ती मिळावी याकरिता सदर आंदोलन शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने करण्यात आले.

यावेळी रायगड जिल्हा संपर्कप्रमुख प्रसाद भोईर आणि जिल्हाप्रमुख सुरेंद्र म्हात्रे यांनी येथील टोल मुक्तीची मागणी लावून धरली असता यावेळी उपस्थित असणारे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी रवींद्र इंगोले, टोल कंपनीचे जनरल मॅनेजर निलेश व्यास, मॅनेजर राजेश कुलकर्णी तसेच पनवेल वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन घाडगे, पोलीस निरीक्षक आनंद कांबळे, उपनिरीक्षक जितेंद्र म्हात्रे यांच्या मध्यस्थीनंतर झालेल्या निर्णयात संबंधित प्रशासन अधिकाऱ्यांनी येथील टोल नाक्यावरून एम एच शुन्य सहा हा नोंदणीकृत क्रमांक असलेल्या वाहनांना टोल मुक्त करण्यात येत असल्याचे मान्य करून त्यामध्ये संबंधित वाहनांनी पंधरा दिवसाच्या आत आपल्या वाहनांचे आरसी बुक व आधार कार्ड येथे जमा करून नोंदणी करून घ्यावी असे सांगितल्यानंतर संबंधित आंदोलन यानंतर स्थगित करण्यात आले.

यावेळी ठाकरे गट तालुकाध्यक्ष समीर म्हात्रे, सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर, शहर प्रमुख सुहास पाटील, राजू म्हात्रे, चेतन मोकल, योगेश पाटील, विजय पाटील, निलेश म्हात्रे, हिराजी चौगुले, मुन्ना आखवारे अदींसह शिवसैनिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

आज आम्ही कोकणचे प्रवेशद्वार समजल्या जाणाऱ्या खारपाडा टोलनाक्यावर स्थानिकांच्या न्याय हक्कासाठी आमचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार आणि जिल्हाप्रमुख सुरेंद्र म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आंदोलन केले. आज त्यात आम्हाला यश आले असून टोलनाका प्रशासनाने आणि राष्ट्रीय महामार्ग विभागाने या टोलनाक्यावरून प्रवास करणाऱ्या स्थानिक एम एच शुन्य सहा नोंदणीकृत असलेल्या वाहनांना परवानगी दिली आहे. त्याचप्रमाणे येथे टोलनाक्यावर काम करणारे कामगार देखील स्थानिकच असतील यावर देखील त्यांनी मान्यता दिलेली असल्याने आज आमचे आंदोलन यशस्वी झाले आहे. असे आंदोलकांनी यावेळी सांगितले.

पंधरा दिवसाच्या आत वाहनांची नोंदणी करून घेणे आवश्यक

मुंबई- गोवा महामार्गावरील खारपाडा येथील सुरू झालेल्या टोल नाक्या विरोधात शिवसेना ठाकरे गटाने केलेल्या आंदोलनामुळे या टोल नाक्यावरून रायगड मधील एम.एच. शून्य सहा या वाहनांना टोल मुक्त करण्यात आल्याचे उपस्थित असणाऱ्या आमच्या संबंधित अधिकाऱ्यांबरोबर झालेल्या चर्चेत निर्णय करण्यात आला आहे.

परंतु येथून ये-जा करणाऱ्या सदर वाहनांनी पंधरा दिवसाच्या आत आपल्या वाहनांची नोंदणी करून घेणे आवश्यक आहे. या वाहनांमध्ये विशेष करून येथील छोट्या मोठ्या कार, जीप आणि स्थानिक शेतकऱ्यांच्या भाजीपाला गाड्या आणि विशेष करून गणपती कारखानदारांच्या मूर्ती वाहक गाड्यांना टोल माफ करण्यात येणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT