पोलादपूर शहर : सह्याद्रीच्या कुशीत वसलेला आणि इतिहासाने समृद्ध असलेला रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुका केवळ निसर्गसौंदर्यासाठीच नव्हे ! तर छत्रपती शिवरायांच्या शौर्यगाथेचा साक्षीदार म्हणूनही ओळखला जातो.
याच तालुक्यातील किनेश्वर हे गाव सध्या एका ऐतिहासिक व धार्मिक ठिकाणामुळे चर्चेत आहे. ‘प्रती तुळजापूर’ म्हणून ओळखले जाणारे येथील ‘गायमुख’ हे स्थळ आता नावाने प्रकाशझोतात आले आहे. गावकर्यांच्या सांगण्यानुसार, हे गायमुख पाच पांडवांच्या अज्ञातवासात वसविलेले असल्याचा समज आहे. हे स्थान रायगड ते प्रतापगड या ऐतिहासिक मार्गाच्या सान्निध्यात असून, त्या मार्गावर घोडेस्वारांची ये-जा होत असे, अशी आख्यायिका स्थानिक नागरिकातून सांगितली जाते.
या परिसराचे खास वैशिष्ट्य म्हणजे धार्मिक आस्था व ऐतिहासिक महत्त्वाचा संगम छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील वेशीवर असलेल्या या स्थळाला अद्यापही अनेक परंपरा, लोक कथा व रहस्ये लाभलेली आहेत. शिवकालीन वारसा चे हे ठिकाण दुर्लक्षित राहणे, हे दुर्दैव असल्याचे स्थानिक ग्रामस्थ आणि शिवप्रेमी मानतात. गायमुख किनेश्वर, श्री तुळजाभवानी मंदिर, आणि प्रतापगडाचा ऐतिहासिक मार्ग या सार्यांचा संगम पोलादपूर तालुक्याला एक वेगळी ऐतिहासिक आणि धार्मिक ओळख देऊ शकतो.
पर्यटन विभागाने व प्रशासनाने एकत्रित प्रयत्न करून या शिवकालीन प्रती तुळजापूर गायमुखाचे महत्त्व उजळून काढावे, हीच या ऐतिहासिक भूमीची आजची खरी गरज आहे. असे म्हटल्यास वावगे ठरू नये.
शासनाने या स्थळांकडे लक्ष दिल्यास, पर्यटन दृष्टिकोनातून इथल्या युवकांसाठी रोजगार निर्मिती, रस्त्यांचे सुशोभीकरण, माहिती फलकांची उभारणी, पायाभूत सुविधा यामुळे संपूर्ण गावाचा विकास साधता येईल. शिवरायांच्या वारसाला खरी मानवंदना हवी असेल, तर या ठिकाणांची जपणूक व प्रचार शासनाने करावा ! असा भावनिक संदेश पोलादपूर तालुक्यातील नागरिकांनी दिला आहे.