महाडमध्ये २४ तासांपासून विजेचा लपंडाव! File Photo
रायगड

महाडमध्ये २४ तासांपासून विजेचा लपंडाव!

रस्त्याची कामे करणाऱ्या यंत्रणेकडून केबलला धक्का?

पुढारी वृत्तसेवा

महाड : श्रीकृष्ण द बाळ

मागील 24 तासापेक्षा जास्त काळापासून महाड शहरासह तालुक्यातील बहुतांश भागात विजेचा लपंडाव सुरू आहे. दरम्यान या संदर्भात प्राप्त झालेल्या माहितीनुसार एमआयडीसी मधून महाडकडे येणाऱ्या भूमिगत केबलला प्रिव्ही स्पेशालिटी हायकल कंपनी व सुदर्शन कंपनीजवळ ब्रेक झाल्याचे सांगण्यात आले आहे.

भूमिगत असलेल्या या दोन्ही केबलना झालेली नादुरुस्ती शोधून काढण्यासाठी पनवेल व पुणे येथून विशेष दक्षतापथक दाखल झाल्याची माहिती अभियंता पवार यांनी दिली आहे. प्राप्त झालेल्या माहितीनुसार, सध्या सुरू असलेली ही कामे आज सायंकाळी चार वाजेपर्यंत पूर्ण होतील व चार नंतर विद्युत पुरवठा पूर्ववत केला जाईल अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.

दरम्यान महाड औद्योगिक वसाहत व बिरवाडी भागातील विद्युत पुरवठा सुरू असल्याचे वृत्त हाती आले आहे. या तालुक्यातील दोन भागाशिवाय उर्वरित सर्व तालुक्यातील विद्युत पुरवठा हा पहाटेपासून खंडित झाला आहे. गेल्या महिन्याभरापासून महाड शहरासह ग्रामीण भागात वाढलेले तापमानाच्या पार्श्वभूमीवर 24 तासांपासून विजेचा सुरू असलेला लपंडाव नागरिकांना अधिक त्रस्त करणारा ठरला आहे. या दरम्यान ज्या मार्गांवरून एमआयडीसी पासून महाडपर्यंत या भूमिगत केबल टाकण्यात आल्‍या आहेत. त्या बहुतांश वसाहतीमधील कंपन्यांच्या प्रवेशद्वारा जवळून गेल्‍या असल्याचे दिसून येते. यामुळे या केबलचे ड्रॉइंग आरेखन संदर्भात या कंपन्यांकडे काही माहिती असेल अशी शक्यता नागरिकांमधून व्यक्त होत आहे. या केबलवर अनेक कंपन्यांकडून मुख्य प्रवेशद्वारा लगत बांधकाम केल्याचेही पहावयास मिळते. महाड औद्योगिक वसाहती मधील रस्त्यांची कामे गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू आहेत. रस्त्यासाठी काम करीत असलेल्या यंत्रणेकडून या भूमिगत केबलला धक्का लागण्याची शक्यता वीज मंडळाच्या अधिकाऱ्यांकडून व्यक्त करण्यात आली.

त्याचप्रमाणे वीज मंडळाच्या अभियंत्यांनी महाड तालुक्यात गेल्या काही दिवसात विजेची प्रचंड मागणी आल्याने दाब वाढल्याचे निदर्शनास आणले. यामुळे विद्युत प्रवाह खंडित होऊ शकतो असे त्यांनी स्पष्ट केले. एकूणच मागील काही दिवसांपासून महाड शहर व परिसरामध्ये सातत्याने खंडित होणारा विद्युत पुरवठा लक्षात घेता वीज वितरण विभागाने व संबंधित यंत्रणेने यासंदर्भात खास दक्षता पथकाची नेमणूक करावी अशी मागणी वीज ग्राहकांकडून करण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT