माथेरानमधील पेव्हर ब्लॉकचे काम दर्जाहीन pudhari photo
रायगड

Matheran Paver Block : माथेरानमधील पेव्हर ब्लॉकचे काम दर्जाहीन

वाखारीचा नाका ते हॉटेल लेक व्ह्यू रस्त्यावर अपूर्ण काम

पुढारी वृत्तसेवा

नेरळ : वाखारीचा नाका ते हॉटेल लेक व्ह्यू या तीव्र उताराच्या रस्त्यावर सुरू असलेल्या पेव्हर ब्लॉकच्या कामात भविष्यातील गरजा लक्षात घेऊन आवश्यक तांत्रिक उपाययोजना करण्यात याव्यात, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात आली आहे. सदर काम एकदाच होत असल्याने नगराध्यक्ष, बांधकाम सभापती, नगर अभियंता तसेच संबंधित लोकप्रतिनिधींनी ठेकेदारास योग्य सूचना देऊन दर्जेदार व दीर्घकालीन टिकणारे काम करून घ्यावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

नागरिकांनी केलेल्या सूचनांमध्ये सर्वप्रथम प्रत्येक महत्त्वाच्या नाक्यावर रस्त्याखालून किमान अर्धा फूट व्यासाचे युटिलिटी होल (डक्ट) ठेवण्याची मागणी करण्यात आली आहे. वाखारीचा नाका, बायोगॅस प्रकल्पाजवळ, हॉटेल बाईकजवळ आणि पांडे प्लेग्राउंडजवळ अशी व्यवस्था केल्यास भविष्यात वीज केबल, पाणीपुरवठा, टेलिफोन व स्ट्रीट लाईटच्या केबल टाकण्यासाठी पेव्हर ब्लॉक उकरण्याची गरज भासणार नाही.

तसेच, तीव्र उताराच्या सुरुवातीला, मध्यभागी आणि शेवटी कायमस्वरूपी तिरपे प्रतिरोधक बंधारे उभारून रस्त्याचा उतार गटाराच्या दिशेने ठेवावा, अशी मागणी करण्यात आली आहे. यामुळे पावसाचे पाणी सुरळीतपणे गटारात जाईल, रस्त्याची धूप कमी होईल आणि दरवर्षी तात्पुरते बंधारे उभारण्याचा खर्चही वाचेल.

रस्त्याच्या खालच्या बाजूला असलेला खोलगट भाग आवश्यक भराव टाकून टप्प्याटप्प्याने उंच करावा, जेणेकरून तीव्र चढ-उतार कमी होऊन वाहनचालक, पादचारी आणि ज्येष्ठ नागरिकांसह प्रवासी व वाहतूक आश्वांसाठी चालण्यासाठी सुरक्षित व सुलभ प्रवास करता येईल, अशीही सूचना करण्यात आली आहे.

याशिवाय, रस्त्यालगतची गटारे जांभा दगडांनी मजबूत पद्धतीने बांधावीत. विशेषतः उघड्यावर आलेल्या झाडांच्या मुळांना आधार मिळावा यासाठी दगडी गटार बांधकाम करण्यात यावे. त्यामुळे मातीची धूप रोखली जाईल, झाडांची मुळे सुरक्षित राहतील आणि वृक्ष कोसळण्याचा धोका कमी होईल, असे नागरिकांचे म्हणणे आहे.

वरील सर्व सूचनांचा गांभीर्याने विचार करून संबंधित ठेकेदारास आवश्यक निर्देश देण्यात यावेत, जेणेकरून वाखारीचा नाका ते हॉटेल लेक व्ह्यू हा रस्ता दर्जेदार, सुरक्षित आणि दीर्घकाळ टिकणारा होईल, अशी मागणी केली आहे.

वाखारीचा नाका ते हॉटेल लेक व्ह्यू या तीव्र उताराच्या रस्त्याचे पेव्हर ब्लॉकचे काम हे अनेक वर्षांसाठी होणारे महत्त्वाचे काम आहे. त्यामुळे केवळ रस्ता तयार करण्यापेक्षा भविष्यातील गरजा लक्षात घेऊन दर्जेदार आणि तांत्रिकदृष्ट्या सक्षम नियोजन करणे आवश्यक आहे. रस्त्याखाली युटिलिटी डक्टची व्यवस्था, पावसाच्या पाण्याचा योग्य निचरा होण्यासाठी कायमस्वरूपी प्रतिरोधक बंधारे, धोकादायक उतार कमी करण्यासाठी आवश्यक भराव तसेच जांभा दगडांची मजबूत गटारे या सर्व बाबींचा समावेश झाल्यास भविष्यात वारंवार रस्ता उकरण्याची वेळ येणार नाही आणि सार्वजनिक निधीचीही बचत होईल.
नितीन सावंत, माजी सदस्य वन संवर्धन समिती, माथेरान

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT