खोपोली : मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेवर मंगळवारी (18 जून) पहाटेच्या सुमारास भातान बोगद्यात 7 ते 8 वाहनांचा भीषण अपघात झाला. या अपघातात 107 बांगलादेशी कैद्यांना घेऊन जाणार्या गाडीसह पोलिसांचा पिंजरा व पोलीस गाडीचाही समावेश आहे. अपघातात 18 पोलिसांसह 12 बांगलादेशी नागरिक जखमी झाले आहेत. जखमींवर पनवेल एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू आहे.
अपघातात पाच पोलिसांच्या पिंजरा गाड्या, एक महामंडळाची बस, एक टेम्पो, एक पोलीस स्कॉर्पिओ आणि एक जीप गाडी यांचा समावेश आहे. हा ताफा मुंबईहून पुण्याकडे बांगलादेशी कैद्यांना घेऊन जात होता. प्राथमिक माहितीनुसार, वेग आणि नियंत्रण सुटल्याने ही वाहने एकमेकांवर आदळली. यामुळे वाहतूक काही तासांसाठी पूर्णपणे ठप्प झाली होती. तर अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि बचाव पथके घटनास्थळी दाखल झाली.
जखमी पोलिसांना तातडीने पनवेलच्या एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले असून अपघात अत्यंत भीषण होता. गाड्या एकमेकांवर आदळल्या होत्या. या अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलीस सीसीटीव्ही फुटेज आणि प्रत्यक्षदर्शीच्या साक्षींच्या आधारे तपास करत आहेत.
या अपघातामुळे मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आणि प्रवाशांना तासंस ताटकळत थांबावे लागले होते. पोलिसांनी तातडीने बचावकार्य हाती घेत रस्ता मोकळा केला, तरी वाहतूक पूर्णपणे पूर्ववत होण्यास बराच वेळ लागला. अपघातामुळे प्रवाशांचा खोळंबा झाला.