Poladpur water tanker crisis Pudhari
रायगड

Poladpur water tanker crisis: पोलादपुरात दहा गाव-वाड्यांवर पाणीटंचाई; पाणीपुरवठ्यासाठी फक्त एक टँकर

खासगी टँकर मागविण्याची वेळ

पुढारी वृत्तसेवा

पोलादपूर: पोलादपूर तालुक्यातील 3 गाव व 7 वाड्यांनी टँकरसाठी मागणी केली आहे, त्या गाव-वाड्यांना एका टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू करण्यात आला आहे. सदरच्या टँकरला 16 फेऱ्या माराव्या लागत आहेत. सद्यस्थितीत 3 गावे व 3 वाड्यांनी टँकरने पाणी पुरविले जाते आहे तर काही नागरिक खासगी टँकर मागवत आहेत.

गावातील पाणीटंचाई लक्षात घेता सेवाभावी संस्थांसह काही राजकीय पक्षांकडून सुद्धा गावागावात टँकरद्वारे पाणी पुरवठा करणे क्रमप्राप्त बनले आहे. तालुक्यातील धरणावर करोडो रुपये खर्ची गेले तरी देवळेसह इतर बंधारे धरण अपूर्ण अवस्थेत असल्याने व उन्हाळ्याच्या हंगामात नद्या-नाले विहिरी तळ गाठत आहेत. धरण उशाला कोरडा घशाला अशी म्हणायची वेळ नागरिकांवर आली आहे.

तालुक्यामध्ये तीन गावे व सात वाड्यांचे प्रस्ताव मंजूर झाले आहेत, त्यांना एक टँकरने पाणीपुरवठा सुरळीत आहे. त्यामध्ये कातळी बंगला, मोरगिरी धनगरवाडी, तुटवली गळतीची वाडी, किनेश्वरवाडी-पेठवाडी, मोरगिरी दळवी वाडी, भोगाव बु. पार्टेवाडी, तामसडे मोरेवाडी या वाड्यांसह चाभारगणी बुद्रुक, चिरेखिड, कुंभळवणे यांनी टँकरसाठी मागणी केली होती.

या पैकी 3 गाव व 4 वाड्यांच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाली असून सद्यस्थितीत 3 गावे यामध्ये चाभारगणी बुद्रुक, चिरेखिड, कुंभळवणे व तीन वाड्या मोरगिरी दळवी वाडी, भोगाव बु. पार्टेवाडी, तामसडे मोरेवाडी यांना पाणी पुरवठा करण्यात येत आहे. मंजूर प्रस्तावापैकी कातलीबंगला टँकरच्या प्रतीक्षेत आहे. एक टँकरद्वारे 16 फेऱ्या मारण्यात येत आहेत. जवळपास 995 नागरिक वस्ती व 285 पशुधनाला टँकरच्या पाण्याचा उपयोग होत आहे.

तालुक्यातील गावागावात सरासरीपेक्षा जास्त पाऊस गेल्या काही वर्षेपासून पडत आहे मात्र पाणी अडविण्यासाठी उपयुक्त असे धरण नसल्याने सदरचे पाणी नदी मार्गे थेट समुद्राला मिळत असल्याने उन्हाळयाच्या काळात तालुक्यातील नद्या कोरड्या तर विहिरी तळागाळाला गेल्याचे विदारक चित्र गेली अनेक वर्षे पाहवयास मिळत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT