पोलादपूर : पोलादपूर नगरपंचायतीच्या शेवटीचा टप्यात नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीने अखेर राजकीय रंग चढवण्यास सुरुवात केली असून, संख्याबळ नसतानाही राष्ट्रवादी काँग्रेसने नगराध्यक्षपदासाठी उमेदवार मैदानात उतरविल्याने तालुक्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
सध्य स्थितीत येथे शिवसेना शिंदे गटाचे बहुमत आहे व आतापर्यंत नगराध्यक्ष शिंदे गट शिवसेना चा आहे शेवटच्या टप्यासाठी राजकीय समीकरणाची मोट बांधत सत्ताधारी पक्षाला धक्का देण्याची तयारी सुरू असल्याची चर्चा नाक्यांनाक्यावर होत आहे.
महायुतीतील घटकपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका आशा सचिन गायकवाड यांनी नगरपंचायतीचे मुख्याधिकारी विनय शिपाई यांच्याकडे नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे पोलादपूरच्या राजकारणात नेमके काय शिजत आहे, याविषयी उत्सुकता वाढली आहे.
नगरपंचायतीतील विद्यमान राजकीय गणिते पाहता राष्ट्रवादी काँग्रेसकडे नगराध्यक्षपद मिळविण्यासाठी आवश्यक तेवढे स्पष्ट संख्याबळ नसल्याची चर्चा आहे. अशा परिस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल करण्यामागे नेमका काय हेतू आहे, याबाबत विविध तर्कवितर्क लढविले जात आहेत.
काहींच्या मते हा राजकीय दबावतंत्राचा भाग असू शकतो, तर काहींच्या मते महायुतीतील अंतर्गत चर्चांमध्ये अधिक बळकटी मिळविण्यासाठी हा डाव टाकण्यात आला असावा. राष्ट्रवादीने उमेदवारी अर्ज दाखल करून शेवटच्या क्षणी तो मागे घेण्याची रणनीती अवलंबली आहे का, याबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत.
यापूर्वी अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये उमेदवारी अर्ज दाखल करून नंतर राजकीय समीकरणांनुसार माघार घेण्याचे प्रकार घडले आहेत. त्यामुळे पोलादपूरातही तशाच प्रकारची राजकीय खेळी सुरू असल्याची चर्चा आहे.
दरम्यान, नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीमुळे पोलादपूरच्या राजकारणात पुन्हा एकदा ‘संगीत खुर्ची’चा खेळ सुरू झाल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे. गेल्या काही वर्षांत नगराध्यक्षपदाभोवती निर्माण झालेली अस्थिरता, बदलती राजकीय भूमिका आणि सत्तेसाठी होणाऱ्या हालचाली यामुळे नागरिकांमध्ये नाराजीचे सूरही उमटताना दिसत आहेत. विकासकामांपेक्षा राजकीय गणितांना अधिक महत्त्व दिले जात असल्याची टीका सर्वसामान्य नागरिकांकडून होत आहे.
आता सर्वांच्या नजरा निवडणुकीच्या पुढील प्रक्रियेवर खिळल्या आहेत. संख्याबळाच्या गणिताला छेद देत राष्ट्रवादी काँग्रेस काही राजकीय चमत्कार घडवणार का, महायुतीत तडजोडीचे सूत्र निघणार का, की नाराज गटाची साथ घेऊन राष्ट्रवादी चमत्कार घडवणार? की उमेदवारी अर्ज मागे घेत राजकीय पडदा टाकला जाणार, याचे उत्तर येत्या काही दिवसांत स्पष्ट होणार आहे. मात्र राष्ट्रवादीच्या या एका अर्जाने पोलादपूरच्या राजकारणात चर्चेचे वादळ मात्र निश्चितच उठविले आहे.
कार्यकाळ सहा महिन्यांचा राहिला
विशेष म्हणजे नगराध्यक्षपदाचा उर्वरित कार्यकाळ अवघा सहा महिन्यांचा राहिला आहे. त्यामुळे या कालावधीसाठी नगराध्यक्षपदाची राजकीय तडजोड होण्याची शक्यता देखील व्यक्त केली जात आहे. महायुतीतील घटकपक्षांमध्ये पदवाटपाच्या सूत्रावर काही अंतर्गत सहमती झाली आहे का, याचीही चर्चा सुरू झाली आहे. जर अशी तडजोड झाली तर राष्ट्रवादी काँग्रेसचा दावा केवळ औपचारिक राहणार नाही, अशी शक्यता राजकीय जाणकारांकडून वर्तविली जात आहे.