PM Narendra Modi | समर्पित मालवाहतूक रेल्वे मार्गिकेमुळे देशाच्या लॉजिस्टिक्स व्यवस्थेला नवी गती; पंतप्रधान नरेंद्र मोदी! 
रायगड

PM Narendra Modi | समर्पित मालवाहतूक रेल्वे मार्गिकेमुळे देशाच्या लॉजिस्टिक्स व्यवस्थेला नवी गती; पंतप्रधान नरेंद्र मोदी!

२०३० पर्यंत जेएनपीटी हे देशातील दशलक्ष टीईयूपेक्षा अधिक क्षमता असलेले ठरणार पहिले बंदर - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पुढारी वृत्तसेवा

पनवेल :- पश्चिम आणि पूर्व समर्पित मालवाहतूक रेल्वे मार्गिका पूर्ण झाल्यामुळे देशाच्या मालवाहतूक क्षेत्रात ऐतिहासिक परिवर्तन घडत आहे. जेएनपीटी बंदरातून डबल-स्टॅक कंटेनर पहिली मालगाडी मार्गस्थ होणे, ही या परिवर्तनाची महत्त्वपूर्ण कामगिरी आहे. यामुळे एका मालगाडीमधून मुंबईहून २५० पेक्षा अधिक ट्रकइतका माल वेगाने वाहून नेता येणार आहे. त्यामुळे मालवाहतुकीचा वेळ व खर्च कमी होईल. ही बाब देशाच्या लॉजिस्टीक व्यवस्थेला एक नवी गती व दिशा देणारी ठरेल, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज येथे केले.

पश्चिम समर्पित मालवाहतूक रेल्वे मार्गिकेच्या ३२६ किमी लांबीच्या आणि २० हजार ७०० कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्चाच्या तीन महत्त्वपूर्ण टप्प्यांच्या राष्ट्रार्पण प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलत होते. दरम्यान व्ही.सी.द्वारे डबल स्टेक मालगाडीला हिरवा झेंडा दाखवून राष्ट्राला समर्पित केले.

उरण येथील जेएनपीए येथे आयोजित कार्यक्रमास राज्यपाल जिष्णू देव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, रोजगार हमी योजना मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री भरतशेठ गोगावले, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, आमदार प्रशांत ठाकूर, महेश बालदी, जिल्हा परिषद अध्यक्ष मंगेश वाकडीकर, नगराध्यक्षा भावना घाणेकर, राज्यपाल महोदयांचे विशेष कार्य अधिकारी डॉ.प्रशांत नारनवरे, जपानच्या मुंबईस्थित वाणिज्य दूतावासाच्या महावाणिज्यदूत श्रीमती सातो हितोमी, डीएफसीसीआयएलचे व्यवस्थापकीय संचालक प्रवीण कुमार,विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल, जिल्हाधिकारी किशन जावळे, नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, मध्य रेल्वेचे महाप्रबंधक राजीव श्रीवास्तव, प्रांताधिकारी पवन चांडक आदींची प्रमुख उपस्थिती होती.

पंतप्रधान मोदी यांनी देशामध्ये २०१४ नंतर पायाभूत सुविधांच्या विकासाला मिळालेल्या वेगाचा उल्लेख करताना पूर्व आणि पश्चिम समर्पित मालवाहतूक रेल्वे मार्गिका यशस्वीपणे पूर्ण झाल्याचे सांगितले. ही मार्गिका देशाच्या व्यापारी व्यवस्थेत मूलभूत परिवर्तन घडवून आणत असून त्या राष्ट्रीय व्यापाराचा आधार बनत असल्याचे त्यांनी नमूद केले.

प्रवासी आणि मालवाहतूक रेल्वे स्वतंत्र झाल्यामुळे दररोज ४३० पेक्षा अधिक मालगाड्या धावू शकतात. ट्रकने लागणारा सुमारे ३० तासांचा प्रवास आता १० ते १२ तासांत पूर्ण होऊ शकतो. १०० किलोमीटर अंतर पार करण्यासाठी लागणारा वेळ पूर्वीच्या तुलनेत निम्म्यापेक्षाही कमी झाला आहे. त्यामुळे इंधनाची बचत, मालवाहतुकीच्या खर्चात घट आणि पर्यावरणाचे संरक्षण यांसारखे अनेक फायदे होत आहेत. एका मार्गिकेत गुंतवणूक केली, मात्र त्यातून अनेक फायदे मिळाले, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.

२०३० पर्यंत जेएनपीटी हे देशातील दशलक्ष टीइयूपेक्षा अधिक क्षमता असलेले पहिले बंदर ठरेल - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, जेएनपीटीला देशाच्या विस्तीर्ण भूभागाशी जोडणारी पश्चिम समर्पित मालवाहतूक मार्गिका कार्यान्वित झाल्यामुळे महाराष्ट्राच्या लॉजिस्टिक्स क्षमतेला मोठी चालना मिळणार आहे. या माध्यमातून देशातील सुमारे ५५ टक्के कंटेनर वाहतूक हाताळणाऱ्या जेएनपीटीच्या माध्यमातून होणाऱ्या मालवाहतुकीत या मार्गिकेमुळे मोठी वाढ होईल. एप्रिल ते ऑगस्टदरम्यान जेएनपीटीने सुमारे ३८.२७ लाख टीईयू कंटेनर हाताळले असून समर्पित मालवाहतूक मार्गिका पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झाल्यानंतर या वाहतुकीला आणखी गती मिळेल. येत्या २०३० पर्यंत जेएनपीटी हे देशातील दशलक्ष टीईयूपेक्षा अधिक क्षमता असलेले पहिले बंदर ठरेल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

फडणवीस पुढे म्हणाले, दादरी, उत्तर प्रदेश ते जेएनपीटी या पश्चिम समर्पित मालवाहतूक मार्गिकेतील जेएनपीटी ते न्यू उमरगाव हा अत्यंत महत्त्वाचा भाग आज कार्यान्वित होत आहे. सुमारे १ हजार ५०० किमी लांबीची ही मार्गिका उत्तर भारताला पश्चिम भारताशी जोडत असून, पश्चिम किनारपट्टीवरील जेएनपीटीसारख्या महत्त्वाच्या बंदराचा लॉजिस्टिक्सचा लाभ देशाच्या मोठ्या भूभागाला मिळणार आहे. महाराष्ट्रातील या मार्गासाठी सुमारे १० हजार कोटींची गुंतवणूक असून, १७८ किमी लांबीचा मार्ग राज्यातून जात असल्याची माहितीही त्यांनी दिली.

ते पुढे म्हणाले, जेएनपीटीच्या विस्तारासोबतच वाढवण बंदर विकसित होत असून, त्यामुळे महाराष्ट्राची सागरी क्षमता आणखी वाढणार आहे. जेएनपीटी आणि वाढवणसारख्या बंदरांना सक्षम रेल्वे मालवाहतूक जोडणी मिळाल्याने महाराष्ट्राला देशातील महत्त्वाचे मॅरिटाईम पॉवर आणि जागतिक लॉजिस्टिक्स केंद्र म्हणून विकसित करण्यास मदत होईल, असा विश्वासही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT