पेण ः स्वप्नील पाटील
पेण तालुक्यातील ग्रामीण भागासह शहरात मागच्या आठ दिवसांपासून विजेचा लपंडाव सुरू असून यामुळे दिवसभरासह रात्री अपरात्री वारंवार वीज खंडित होत असल्याने लहान मोठ्या उद्योगधद्यांना याचा मोठा फटका बसत आहे.या वीज खंडितमुळे नागरिक कमालीचे हैराण झाले असून यंदाच्या पावसाच्या सुरुवातीलाच विद्युत मंडळ नापास झाल्याचे बोलले जात आहे.
पेण तालुक्यात विजेचा वारंवार खेळखंडोबा सुरू असल्याने यामुळे अनेक गणपती कारखानदार तसेच लघुउद्योग वाले आणि हॉटेल व्यवसायिक यामुळे पुरते हैराण झाले आहेत.
एकीकडे पावसाळ्याच्या अगोदरच मे महिन्यामध्ये वीजपुरवठा सुरळीत व्हावा याकरिता महावितरण कंपनीकडून अनेकदा वीज पुरवठा खंडित करत मुख्यलाईन वरील झाडेझुडपे तसेच विद्युत पोल त्यावरील लाईन याचे काम योग्य प्रकारे करण्यात आले खरे मात्र दोन दिवसांपूर्वी आलेल्या वादळी वार्याच्या पावसामुळे वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्याने तालुक्यातील नागरिक हैराण झाले आहेत.
गेल्या चार पाच दिवसांपासून पेण शहरासह ग्रामीण भागातील अंतोरे, वाशी, वढाव, कासमाळ, विराणी, रानसई, शेणे, आदी वाड्या वस्त्यांवर सातत्याने विद्युत वीज पुरवठा खंडित होत.
याबाबत महावितरण कार्यालयाकडे अनेकदा तक्रारी करून सुद्धा संबंधित अधिकारी याकडे कानाडोळा करत असल्याने नागरिकांमधून महावितरणच्या व्यवस्थापनाबाबत संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
पेण तालुक्यात थोडासा वादळवारा होत नाही तोच येथील वीज पुरवठा वारंवार खंडित होतो यामुळे येथील व्यावसायिकांवर मोठा परिणाम होत आहे.त्यांचे यामुळे अनेक नुकसान होत असून नागरिकांनाही याचा मोठा फटका बसत आहे त्यामुळे महावितरण कंपनीने नागरिकांच्या हिताच्या दृष्टिकोनातून वीज पुरवठा कसा सुरळीत होईल याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.अन्यथा येत्या काही दिवसात वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून महावितरण कंपनीवर महामोर्चा काढण्यात येईल.सुनील धामणकर- अध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी पेण तालुका
पेण मध्ये एमएसईबी च्या माध्यमातून अनेक ठिकाणी योग्यरित्या कामे करण्यात आली असून नैसर्गिक दृष्टिकोनातून दोन दिवसांपूर्वी झालेल्या वादळी वार्यामुळे शहरासह तालुक्यातील काही ठिकाणी वीज पुरवठा खंडित झाला परंतु त्यामध्ये काही ठिकाणी पोलांसह तारा तुटल्यामुळे वीजपुरवठा खंडित झाला मात्र लागलीच एमएसईबीच्या कर्मचार्यांनी वीज पुरवठा सुरळीत केला आहे.एस.झेड.खोब्रागडे महावितरण अधिकारी