Prashant Jagdale  pudhari photo
रायगड

Raigad Crime : पेणमध्ये ५० हजारांची लाच घेताना दुय्यम निबंधक एसीबीच्या जाळ्यात

ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची धडक कारवाई

पुढारी वृत्तसेवा

पेण : नोंदणी प्रक्रियेचे काम मार्गी लावण्यासाठी तक्रारदाराकडून ५० हजार रुपयांची लाच स्वीकारताना पेण येथील दुय्यम निबंधक कार्यालयाचे प्रमुख प्रशांत जगदाळे यांना ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने आज सायंकाळी रंगेहाथ पकडले. अवघ्या दोन महिन्यांपूर्वीच पेण कार्यालयात रुजू झालेल्या या अधिकाऱ्यावर एसीबीने कारवाई केल्याने महसूल व नोंदणी विभागात मोठी खळबळ उडाली आहे.

तक्रारदाराचे नोंदणी संबंधित अधिकृत काम करून देण्याच्या बदल्यात लोकसेवक प्रशांत जगदाळे यांनी लाचेची मागणी केली होती. धक्कादायक बाब म्हणजे, याच प्रकरणात जगदाळे यांनी यापूर्वीच तक्रारदाराकडून एक लाख रुपयांची रक्कम स्वीकारली होती. त्यानंतर लाचेचा दुसरा टप्पा म्हणून ५० हजार रुपयांची मागणी करण्यात आली होती. या सततच्या मागणीला कंटाळून तक्रारदाराने ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेत तक्रार दाखल केली.

तक्रारीची खातरजमा केल्यानंतर ठाणे एसीबीच्या पथकाने पेण येथे सापळा रचला. सायंकाळच्या सुमारास तक्रारदाराकडून ५० हजार रुपयांची लाच स्वीकारताच एसीबीच्या अधिकाऱ्यांनी प्रशांत जगदाळे यांना रंगेहाथ ताब्यात घेतले. या कारवाईनंतर पेण येथील दुय्यम निबंधक कार्यालयात रात्री उशिरापर्यंत एसीबी पथकाकडून पंचनामा व पुढील कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू होती.

दोन महिन्यांपूर्वीच पदभार स्वीकारलेल्या या अधिकाऱ्याच्या कारवाईमुळे सरकारी कार्यालयांतील भ्रष्टाचाराचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. सामान्य नागरिकांची शासकीय कामे पारदर्शकपणे आणि विहित वेळेत पूर्ण होणे अपेक्षित असताना, अशा प्रकारच्या लाचखोरीच्या घटनांमुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर तीव्र संताप व्यक्त होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT