पेण तालुक्यामध्ये गेल्या पंधरा दिवस पावसाने चांगलाच धुमाकूळ घातला होता, त्यामुळे भातकापणीची कामे ठप्प झाली होती. या परतीचा पावसाचा फटका शेतकरी बांधवांना बसला आहे.
परतीच्या पावसामुळे अनेक शेतकर्यांच्या भातपिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. तयार झालेले भातपीक जमीनदोस्त झाले. अनेक शेतकर्यांनी भाताची कापणी सुरू केली आहे. मात्र पुन्हा अवेळी पावसाच्या भीतीने शेतकरीवर्ग चिंतेमध्ये आहे. 3 ते 4 दिवसांच्या या पावसाच्या विश्रांतीमुळे तालुक्यात शेतकर्यांची मोठ्या जोराने हळवी भाताची शेती कापणीस जरी सुरुवात केली असली तरी आजही या शेतकर्यांसमोर अवेळी पावसाच्या भीती व्यतिरिक्त शेतीमध्ये आजही तुंबलेले पाणी, कापणीनंतर भात सुकवणीचा प्रश्न तसेच मजुरांचा प्रश्न कायम आहेत. सध्या शेतकरी भात पीक येवून देखील पुन्हा पावसामुळे अडचणीतच आहे.
पेण तालुक्याच्या अनेक ठिकाणी भात कापणी सुरू झाली आहे. शेतातील पाण्याचा विचार न करता शेतीची कापणी करून शेताच्या बांधावर कापलेले भात सुकवण्याचे काम सुरू आहे. काही ठिकाणी आजही शेतामध्ये एवढे पाणी आहे की कापणी करू शकत नाही, यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. अवेळी पावसामुळे दरवर्षी भात पिकाचे नुकसान होत असले तरी शासकीय नियमामध्ये पावसाचे प्रमाण बसत नसल्याने शेतकर्यांना नुकसान भरपाई मिळत नाही.
75 टक्के पीक परिपक्व पेण तालुक्यात सप्टेंबर अखेरीपासून भातपीक परिपक्व होण्यास सुरुवात होते. त्यानंतर गेल्या पंधरा दिवसांत तर जिल्ह्यातील सुमारे 75 टक्के भातपीक परिपक्व झाले आहे. परंतु सतत पडणार्या पावसामुळे शेतकर्यांना भात कापणी करता आलेली नाही. अनेक शेतकर्यांचे भातपीक पावसामुळे जमिनीवर आडवे झाले आहेत
दरवर्षी बाळगंगा प्रकल्प बाधित शेतकर्यांच्या भात शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन सुद्धा कोणत्याच प्रकारची नुकसान भरपाई मिळत नाही त्यामुळे शासनाने याची दखल घेऊन बालगंगा प्रकल्प बाधित शेतकर्यांना सुद्धा नुकसान भरपाई मिळावी.- शरद जाधव, प्रगतशील शेतकरी