Pen Rain Damage Salt Farms Pudhari
रायगड

Pen Rain Damage Salt Farms: पेणमधील दीडशे एकर मिठाची शेती उद्ध्वस्त; मुसळधार पावसासह उधाणाच्या लाटांचा फटका

शिर्की सहकारी केंद्रातील मिठाची शेकडो पोती, भातही भिजला

पुढारी वृत्तसेवा

कमलेश ठाकूर

पेण: गेल्या तीन-चार दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आणि वादळी वाऱ्याच्या उधाणाच्या लाटांमुळे पेण तालुक्यातील खारेपाट भागातील शिर्की येथील मिठाचे आणि शासकीय भात खरेदी केंद्राचे संचालक कल्पेश पाटील आणि वंदना म्हात्रे यांच्यावर निसर्गाचा मोठा घाला पडला आहे. या नैसर्गिक आपत्तीत त्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून, शासनाने तातडीने मदत करावी, अशी मागणी केली जात आहे.

१५० एकर मिठाची शेती उद्ध्वस्त; लाखो रुपयांचे नुकसान

सद्गुरू कृपा नावीन्यपूर्ण सहकारी संस्था शिर्कीचे संचालक वंदना म्हात्रे व कल्पेश पाटील हे सुमारे १५० एकर जमिनीवर समुद्राचे खारे पाणी आत घेऊन, वर्षभर शेकडो कामगारांच्या मदतीने शुद्ध, पांढरे शुभ्र नैसर्गिक मीठ तयार करण्याचे मोठे उत्पन्न घेतात.

दरवर्षीप्रमाणे यंदाही पावसाळ्यात विक्रीसाठी त्यांनी या मिठाच्या राशी (साठे) मिठाच्या शेतीच्या बांधावर प्लास्टिक कापडाने बांधून ठेवल्या होत्या.मात्र, निसर्गाने रौद्र रूप धारण केल्यामुळे सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पावसामुळे मिठाच्या शेतीचे बांध पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहेत.

प्लास्टिक कापडात बांधून ठेवलेल्या सुमारे २ हजार टन मिठाच्या गोणी पावसात भिजून वाहून गेल्या आहेत. वर्षभर उन्हातान्हात घेतलेली मेहनत आणि मजुरी पाण्यात गेल्याने संस्थेला मोठा आर्थिक फटका बसला आहे.

१२ हजार टन भात आणि मच्छी तलावाचेही नुकसान झाले आहे. मिठासोबतच कल्पेश पाटील हे मत्स्य व्यवसायाचे कामही करतात. परंतु, गेल्या तीन-चार दिवसांच्या संततधार पावसामुळे त्यांच्या मच्छी तलावातील सर्व मच्छी वाहून गेली आहे.

दुसरीकडे, याच संस्थेच्या शेतकऱ्यांकडून खरेदी करून साठवून ठेवलेला सुमारे १२ हजार टन भात पावसाचे पाणी शिरल्यामुळे पूर्णपणे भिजले आहे. शासकीय खरेदी केंद्र म्हणून हे भात मोठ्या प्रमाणात साठवले गेले होते, जे आता भिजलेल्या स्थितीत आहे.

गेली काही दिवस तालुक्यात झालेल्या निसर्गाच्या प्रकोपाने आमचे अतोनात नुकसान झाले आहे. वर्षभराची मेहनत आणि लाखो रुपयांचे भांडवल एका झटक्यात नष्ट झाले. या मोठ्या संकटाचा विचार करून शासनाने तत्काळ पंचनामे करावेत आणि संस्थेला आर्थिक मदत जाहीर करावी.
- कल्पेश पाटील, संचालक, सद्गुरूकृपा नावीन्यपूर्ण सहकारी संस्था

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT